मुंबई : कोरोना साथीच्या काळात भारतीयांसाठी वरदान ठरलेल्या कोव्हिशिल्ड लशीबाबत गेल्या काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरु आहे. कोरोना काळात ज्यांनी कोव्हिशिल्ड लस टोचून घेतली आहे, त्यांच्यापैकी काहीजणांना त्याचे दुष्परिणाम जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ही लस घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्यावर तर याचा दुष्परिणाम झाला नाही ना, अशी धास्ती वाटू लागली आहे. या पार्श्वभूमीवर कोव्हिशिल्ड लशीची निर्मिती करणाऱ्या ॲस्ट्राझेन्का या कंपनीने एक महत्त्वाची घोषणा केली आहे.
ॲस्ट्राझेन्काने जगभरातून कोव्हिशिल्ड लशीचा साठा परत मागवून घेणार असल्याचे जाहीर केले आहे. मंगळवारी कंपनीने याबाबतची घोषणा करत जगभरातून कोव्हिशिल्ड लस मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. लशीच्या दुष्परिणामांच्या चर्चेमुळे कंपनीने हा निर्णय घेतल्याची चर्चा होती. परंतु, मुळात आता जागतिक स्तरावर या लशीची मागणी अत्यंत कमी असल्याने ॲस्ट्राझेन्काने लस परत मागवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. कोरोना साथीच्या काळात कोव्हिशिल्ड ही जगात उपलब्ध असणाऱ्या मोजक्या प्रतिबंधक लशींपैकी एक होती. मात्र,आता बाजारपेठेत कोरोनासाठीच्या आणखी प्रगत लशी उपलब्ध आहेत. साहजिकच त्यामुळे कोव्हिशिल्ड लशीची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे ॲस्ट्राझेन्का कंपनीने कोव्हिशिल्ड लशीची निर्मिती आणि वितरण थांबवले आहे.
कोव्हिशिल्ड लशीमुळे कोणते दुष्परिणाम?
गेल्या काही दिवसांमध्ये कोव्हिशिल्ड लशीचे दुष्परिणाम भोगलेल्या अनेकजणांची उदाहरणे समोर आली आहेत. ब्रिटनमध्ये यावरुन न्यायालयात वाद सुरु आहे. या प्रकरणात न्यायालयात कोव्हिशिल्ड लसीचे दुष्परिणाम झालेल्या रुग्णांची यादी सादर करण्यात आली. त्यापैकी अनेक रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गुठळ्या होत असल्याची बाब समोर आली होती. ॲस्ट्राझेन्का कंपनीनेही कोविशिल्डमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच थ्रोम्बोसिस होऊ शकतो, त्यामुळे रक्तात गुठळ्या तयार होऊ शकतात, याची कबुली न्यायालयात दिली होती. मात्र, लाखांमध्ये एखाद्या व्यक्तीमध्ये ही लक्षणे दिसू शकतात, असे कंपनीचे म्हणणे आहे. भारतातील तज्ज्ञ डॉक्टरांनी आणि कोरोना काळात परिस्थिती हाताळलेल्या आयसीएमआरच्या माजी शास्त्रज्ञांनी कोव्हिशिल्ड लशीपासून भारतीयांना कमी धोका असल्याचे म्हटले आहे.