बंगळुरु : कर्नाटकच्या किनारपट्टीच्या भागात मान्सून धडक देण्यापूर्वी मुसळधार पावसानं बंगळुरुला झोडपून काढलं आहे. रविवारी रात्री बंगळुरुत मुसळधार पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळं जनजीवन विस्कळीत झालं होतं. रविवारी बंगळुरु झालेल्या मुसळधार पावसानं आणि वादळी वाऱ्यानं शहरात काही ठिकाणी झाडं उन्मळून पडली होती. रविवारचा दिवस बंगळुरुसाठी सर्वाधिक पावसाचा दिवस ठरला. जून महिन्यात एकाच दिवशी सर्वाधिक पाऊस होण्याचा रेकॉर्ड काल मोडलं गेलं. बंगळुरुत काल 111.1 मिमी पावसाची नोंद झाली. रविवारी बंगळुरुत झालेला पाऊस जून महिन्यातील गेल्या 133 वर्षातील सर्वाधिक पाऊस ठरला.
भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार बंगळुरुत जून महिन्यातील एका दिवशी सर्वाधिक पावसाची नोंद 16 जून 1891 मध्ये झाली होती. त्या दिवशी बंगळुरुत 101.6 मिमी पावसाची नोंद झाली होती. हे रेकॉर्ड गेल्या 133 वर्षांपासून कायम होतं. रविवारी झालेल्या पावसानं 1891 मधील रेकॉर्ड तब्बल 133 वर्षांनी मोडलं गेलं.
बंगळुरुमध्ये जून महिन्यात सर्वसाधारणपणे 110.3 मिमी पावसाची नोंद होते. रविवारी झालेल्या पावसानं हे रेकॉर्ड देखील मोडलं केलं. रविवारी बंगळुरुत 111.1 मिमी पावसाची नोंद झाली. गेल्या दोन दिवसांपासून बंगळुरुत 120 मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कर्नाटकच्या महसूल विभागाच्या अंतर्गत असलेल्या कर्नाटक राज्य नैसर्गिक आपत्ती नियंत्रण केंद्राच्या माहितीनुसार बंगळुरुच्या सर्व भागांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. बंगळुरुतील हम्पी नगर भागात 110.50 मिमी पावसाची नोंद झाली. यानंतर मारुती मंदिर वॉर्डमध्ये 89.50 मिमी, विद्यापीठ 88.50 मिमी आणि कॉटन पेटमध्ये 87.50 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बंगळुरुमध्ये आगामी काही दिवसांमध्ये ढगाळ वातावरण राहू शकत. बंगळुरुत 30 ते 40 किमी प्रति तास वेगानं वारे वाहू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं बंगळुरुमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. 3 ते 5 जून दरम्यान बंगळुरुत ढगाळ वातावरण राहू शकेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
बंगळुरुत झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसानं शहरात तब्बल 100 झाडं उन्मळून पडली. तर 500 झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. पावसाच्या काळात काही काळासाठी वीज पुरवठा खंडित करण्यात आला. तर, काही ठिकाणी विजेच्या तारा देखील तुटल्या होत्या. शहरात काही ठिकाणी विजेचे खांब देखील पडल्याचं माहिती राज्य वीज मंडळाकडून देण्यात आली आहे.