बेंगळुर (वार्ता) : रामदुर्ग तालुक्यातील बोचबाळ गावात लसीकरणानंतर 2 मुले दगावल्याप्रकरणी सहायक नर्स आणि फार्मासिस्टला निलंबित करण्याचा आदेश आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी दिला आहे.
बेंगळूरमध्ये सोमवारी याबाबत पत्रकारांशी बोलताना आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, या प्रकरणाचा अहवाल अधिकार्यांकडून मागवला आहे. 10 जानेवारीला 4 मुलांना एमआर लस देण्यात आली होती. त्यांना रात्री उलट्या-जुलाबाचा त्रास होऊन एक मूल त्यादिवशीच रात्री 10.30च्या सुमारास दगावले. एका मुलाला रामदुर्ग इस्पितळात दाखल केले होते. तर दोन मुलांना बेळगावात बिम्स इस्पितळात दाखल केले होते. 12 जानेवारीपर्यंत ही मुले ठीक होती. सस्पेक्ट शॉक सिंड्रोममुळे त्या मुलांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तरीही आणखी चौकशी केली जाईल. सध्या एएनएम (नर्स) आणि फार्मासिस्टला त्वरित निलंबित करण्याचा आदेश बजावला आहे. राज्याच्या नोडल अधिकार्याला रामदुर्गला पाठवून कोल्ड चेन, शास्त्रीय प्रक्रिया पार पाडली जाते की नाही आदींबाबत चौकशी करून 2 दिवसांत अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत असे ते म्हणाले.दरम्यान, आज सायंकाळी मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या कोविडविषयक बैठकीत काय होईल हे आताच कसे सांगता येईल असे सांगून आरोग्यमंत्री सुधाकर म्हणाले, बैठकीत राज्यात किती कोरोनाबाधित आहेत, मुलांवर काय परिणाम होत आहेत, इस्पितळांची सज्जता आदींवर प्रामुख्याने चर्चा होईल. तांत्रिक सल्लागार समितीचे सदस्य, मंत्र्यांशी चर्चा करून मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील. बैठक संपल्यावर त्याबाबत माहिती देईन असे ते म्हणाले.जे काही करायचे आहे ते जरूर करू, मुख्यमंत्री सतत सभा घेऊन चर्चा करत आहेत. 2-3 दिवसानंतर एक सभा घेत आहेत. एकंदर राज्यात कोरोना नियंत्रणात आणून जीवहानी टाळण्याचा प्रयत्न सुरु आहे. जी पावले उचलायची ती उचलण्यात येतील असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.