बंगळूर : यावेळी गौरी गणेशोत्सवादरम्यान प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) मूर्तींवर बंदी घालण्याचे निर्देश वन आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी दिले. सर्व जिल्हा प्रशासनांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या वापरावर कटाक्ष ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आणि जलस्रोत प्रदूषित करणाऱ्यांवर हवा आणि जल कायद्यांतर्गत फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, आतापर्यंत केवळ निर्देश दिले जात आहेत. मात्र आता त्यापूर्वीच शासकीय आदेश काढण्यात आला आहे. खांड्रे यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांच्यासह सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पर्यावरणपूरक मूर्ती आणि हिरव्या फटाक्यांच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली समित्या स्थापन करण्याचे आदेश दिले.
शिरुर आणि वायनाडमध्ये नुकत्याच झालेल्या भूस्खलनाचा संदर्भ देत खांड्रे म्हणाले की, पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पीओपी मूर्तींची निर्मिती, विक्री, संकलन आणि वाहतूक यावर सरकारने बंदी घातली असली तरी त्यांचा वापर होत असल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे पर्यावरण विभाग आणि कर्नाटक राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला (केएसपीसीबी) कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले असून पोलीस, वाहतूक आणि व्यावसायिक कर विभाग यांच्या समन्वयाने काम करावे. सार्वजनिक मूर्ती स्थापनेसाठी परवानगी देताना पीओपी मूर्तींचा वापर करणार नाही, फटाके फोडणार नाही, मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करण्यात येईल असे लिहून घेण्यात यावे, अशा सूचना खांड्रे यांनी केल्या.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील जनतेला ही गणेश चतुर्थी पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे या आधीच आवाहन केले होते. त्यांनी त्यांच्या एक्स खात्यात म्हटले होते की, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने पीओपीच्या गणेशमूर्तींची विक्री, हेवी मेटल पेंटने सजवलेल्या आणि त्यांची पाण्यात विल्हेवाट लावणे हा दंडनीय गुन्हा आहे.
जलचर आणि जलस्रोतांचे जीवन रक्षण करण्याची जबाबदारी ओळखून केवळ मातीच्या गणेशाची पूजा करूया, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले होते.