कुमठा : ट्रॅक मॅनच्या कार्यतत्परतेमुळे मोठा रेल्वे अपघात टळला अन्यथा शेकडो प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असता. कोकण रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी ट्रॅक मॅन महादेवाच्या या कार्याबद्दल कौतुक केले आहे.
कोकण रेल्वेच्या कुमठा-होन्नावर दरम्यान ट्रॅक जोडणीचे वेल्डिंग करणे बाकी होते. बुधवारी पहाटे 4.50 वाजता ट्रॅक मॅन महादेवच्या हा प्रकार लक्षात आला. या मार्गावरून धावणाऱ्या तिरुअनंतपुरम-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस गाडीला थांबवण्यासाठी त्यांनी तात्काळ कुमठा स्टेशनला कळवले. मात्र, तोपर्यंत रेल्वेने स्टेशन सोडले होते. त्यानंतर महादेवने राजधानी रेल्वेच्या लोको पायलटला फोन केला. पण कनेक्ट होऊ शकला नाही. 8 मिनिटात रेल्वे ज्या ठिकाणी वेल्डिंग राहिले होते तिथे येणार होती. कोणताही विलंब न करता महादेव रुळावरून धावत जाऊन पाच मिनिटांत अर्धा किमी अंतर कापले. क्रॉस करून रेल्वे थांबण्याची सूचना केली. त्यामुळे संभाव्य धोका टळला. ज्या ठिकाणी वेल्डिंग राहिले होते ते वेल्डिंग केल्यानंतर रेल्वे कारवारच्या दिशेने धावली.
महादेवच्या कार्यतत्परतेबद्दल रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले. कोकण रेल्वेचे सीएमडी संतोष कुमार झा यांनी महादेव नायकाला १५ हजार रोख बक्षीस जाहीर केले. कोकण रेल्वेचे वरिष्ठ अभियंता बी.एस. नाडगे यांनी मुरुडेश्वरजवळील रेल्वे मार्गावर महादेव नायकाचा गौरव केला. कोकण रेल्वे झोनने ट्विट करून महादेव यांना त्यांच्या कार्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.