बंगळूर : केंद्र सरकारकडून राजभवनाचा गैरवापर केला जात आहे. माझा राजीनामा मागण्यासाठी भाजपकडे कोणती नैतिकता आहे? मी काही चूक केली नाही, त्यामुळे मी राजीनामा देणार नाही, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले.
म्हैसूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे मंडकल्ली विमानतळावर आगमन झाल्यावर काँग्रेस नेते आणि शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.
माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, राज्यपालांनी प्रशासनात हस्तक्षेप करू नये. राज्याच्या जनतेने आम्हाला पाच वर्षे राज्य करण्याची संधी दिली आहे. केंद्र सरकार सर्वत्र राजभवन, सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करत असल्याचा आरोप करत भाजपच्या राजीनाम्याच्या मागणीला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, मी का राजीनामा द्यावा?”
ज्यांनी चूक केली आहे त्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. गोध्रा दंगल झाली तेव्हा मोदींनी राजीनामा दिला का, एफआयआर नंतर जामीन मिळालेल्या एच. डी. कुमारस्वामी यांनी राजीनामा का दिला नाही. मी काही चूक केली नाही. मग राजीनामा का देऊ ? माझा राजीनामा मागण्याची भाजपकडे नैतिकता आहे का, असा सवाल त्यांनी केला.
मी कायदेशीर लढा सुरूच ठेवणार आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री पदाचा राजीनामा तर देणारच नाही. राज्यपालांच्या पत्राला मुख्य सचिवांनी उत्तर न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे ते म्हणाले.
कार्यकर्त्यांचा मरीगौडा यांना घेराव
विमानतळावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे स्वागत करण्यासाठी आलेल्या मुडा अध्यक्ष के. मरीगौडा यांना काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेराव घालून घोषणाबाजी केली. आमच्या सिद्धरामय्या यांना तुमच्यामुळे हा वेळ आली आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी करून त्यांना गाडीत बसवून परत पाठवले.
यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे आप्तेष्ट मरीगौडा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी मरिगौडा यांनी कार्यकर्त्यांना शांत करून समेट घडवून आणण्याची तयारी दर्शवली. मात्र कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ केली. धिक्कार, धिक्कार… मेरीगौडा धिक्कार अशा घोषणा देऊन त्यांना परत पाठविले.