बंगळूर : माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांच्या आक्षेपार्ह सीडी प्रकरणाचा अंतिम चौकशी अहवाल सादर करण्यास कर्नाटक उच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. विशेष तपास पथकाने (एसआयटी) दंडाधिकारी न्यायालयात अंतिम अहवाल सादर करावा असे न्यायालयने निर्देश दिले आहेत.
बंगळुरमधील कब्बन पार्क पोलिस स्थानकामध्ये रमेश जरकीहोळीविरुद्ध लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
उच्च न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न सोडून दंडाधिकारी न्यायालयासमोर चौकशी अहवाल सादर करण्यास परवानगी दिली आहे. एसआयटीने अंतिम अहवाल सादर करण्याची मागणी केली होती. सध्या एसआयटीच्या तपासावर प्रश्नचिन्ह असलेल्या तरुणीच्या अर्जावर आज सुनावणी करून न्यायालयाने तपास अहवाल सादर करण्यास सांगितले.
लैंगिक छळाच्या आरोपावरून रमेश जारकीहोळी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणाचा तपास आता पूर्ण झाला असून अहवाल सादर होणार आहे. एसआयटीच्या अंतिम अहवालावर रमेश जारकीहोळी यांचे राजकीय भविष्य अवलंबून आहे.
पिडीत महिलेचा आरोप सिद्ध न झाल्यास आणि बी अहवाल दाखल झाल्यास रमेश जारकीहोळींची निर्दोष मुक्तता होईल. आरोपपत्र दाखल झाल्यास रमेश जारकीहोळी अडचणीत येतील. त्यामुळे अंतिम अहवालावर रमेश जारकीहोळी यांचे भवितव्य ठरणार आहे.
दरम्यान, चौकशी अहवाल विरोधात गेल्यास सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे संकेत पिडीत महिलेचे वकील इनगी यांनी दिले आहेत.
Check Also
9 ते 20 डिसेंबर दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन
Spread the loveबेळगाव : येत्या 9 ते 20 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधान सौध येथे राज्याचे …