Thursday , November 21 2024
Breaking News

२ कोटींचा तिकीट घोटाळा प्रकरण : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक

Spread the love

 

बंगळूर : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचा भाऊ आणि त्यांच्या मुलाला गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान २ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या आरोपाखाली दाखल झालेल्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे.
भाजपचे माजी आमदार देवानंदसिंह चव्हाण यांच्या पत्नी सुनीता चव्हाण यांच्या तक्रारीनंतर बंगळुरच्या बसवेश्वरनगर पोलिसांनी प्रल्हाद जोशी यांचा मोठा भाऊ गोपाळ जोशी यांना कोल्हापुरात आणि गोपाळ यांचा मुलगा अजय जोशी यांना पुण्यात अटक करून त्यांना बंगळुरला आणले आहे.
तक्रार दाखल झाली तेव्हा गोपाळ जोशी फरार होते. पोलिसांनी तपास केला असता गोपाळ जोशी हे कोल्हापुरात लपून बसले होते. त्याना अटक करण्यात पेलिसांना यश आले.
लोकसभा निवडणुकीत भाजपचे तिकीट देण्यासाठी फसवणूक केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांचे भाऊ गोपाळ जोशी आणि बहीण विजयालक्ष्मी जोशी यांच्या विरोधात बंगळूर येथील बसवेश्वरनगर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले होते.
मंत्री प्रल्हाद जोशी यांचे भाऊ गोपाळ जोशी, बहीण विजयालक्ष्मी जोशी आणि गोपाळ जोशी यांचा मुलगा अजय जोशी यांनी तिकीट न देता आणि पैसे परत न करता दोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार सुनीता चव्हाण यांनी केली आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता.
माझे पती देवानंद फुलसिंग हे २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत विजयपूर जिल्ह्यातील नागठाणा मतदारसंघाचे आमदार होते. त्यानंतर २०२३ च्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत विजयपूर मतदारसंघातून आपल्या पतीला भाजपचे तिकीट देणार असल्याचे गोपाळ जोशी यांनी सांगितले आणि त्यांना २५ लाख आणि पाच कोटी रुपयांचा आगाऊ धनादेश मिळाला होता.
अथणी येथे अभियंता असलेले शेखर नाईक यांच्यामार्फत त्यांची गोपाळ जोशी यांच्याशी ओळख झाली. गोपाळ जोशी यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पैसे आणि चेक घेऊन त्यांची बहीण विजयालक्ष्मी यांच्या बंगळुर येथील बसवेश्वर नगर येथील घरी गेलो. त्यावेळी त्यांच्या बहिणीच्या घरी असलेले गोपाळ जोशी यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या निकटवर्तीयाला बोलावून त्यांच्याशी बोलण्याचे नाटक केले. तसंच पतीला भाजपच्या तिकीटाची खात्री असल्याचं सांगत त्यांनी टप्याटप्याने दोन कोटी रुपये घेतले.
पक्षाचे तिकीट न मिळाल्याने त्यांनी पैसे परत मागितले असता त्यांनी कारणे सांगण्यास सुरुवात केली. एक ऑगस्ट रोजी मी विजयालक्ष्मी यांच्या निवासस्थानी गेलो असता, माझ्यावर हल्ला करण्यात आला आणि मला शिवीगाळ करण्यात आली. मला आणि माझ्या मुलाला धमकावले, असा दावाही त्यांनी तक्रारीत केला आहे.
तक्रारीनंतर, पोलिसांनी तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता.
प्रकरणाशी काहीही संबंध नाही : प्रल्हाद जोशी
मला बहीण नाही. गोपाळ जोशी यांच्या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी स्पष्ट केले.
गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला तिकीट देण्यासाठी फसवणूक केल्याप्रकरणी जोशी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
गोपाळ जोशी यांच्या वरील प्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. सर्वप्रथम मला बहीण नाही. याशिवाय माझ्या आईला गोपाळ जोशी यांच्यासह चार मुले आहेत. मात्र, गेल्या ३२ वर्षांपासून ते गोपाळ जोशी यांच्या संपर्कात नव्हते. केवळ गोपाळ जोशीच नाही, इतरही त्यांच्या कामासाठी माझ्या नावाचा गैरवापर करत आहेत, याच्याशी माझा काहीही संबंध नाही.
२०१३ मध्ये, बंगळुरच्या सिटी सिव्हिल कोर्टाने माझे नाव कोणाशीही सांगू नये असा प्रतिबंधात्मक आदेश जारी केला. न्यायालयाच्या प्रतिज्ञापत्रात त्याचा तपशील आहे. पुढे, बंगळुरमध्ये नोंदवलेल्या एफआयआरमध्ये विजयालक्ष्मीचा उल्लेख माझी बहीण असा आहे. खरं तर मला एकही बहीण नाही. हा सगळा प्रकार पाहिला तर तो बोगस असल्याचे उघड आहे, असे सांगून गोपाळ जोशी म्हणाले की, चूक असेल तर कायदेशीर कारवाई करावी.
तक्रार घेतली मागे
दरम्यान, ही अडचण दूर झाली असून खटला मागे घेण्यात आला आहे, असे तक्रारदार धजदचे माजी आमदार देवानंद चव्हाण यांच्या पत्नी सुनीता चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, तीन जणांना अटक करण्यात आली असल्याच्या गृहराज्यमंत्री परमेश्वर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना, कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. माझ्या मनात त्यांच्याबद्दल कोणताही राग नाही. त्यांना दिलेले पैसेही तीन-चार जणांचे आहेत. पैसे परत मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

9 ते 20 डिसेंबर दरम्यान कर्नाटकचे हिवाळी अधिवेशन

Spread the loveबेळगाव : येत्या 9 ते 20 डिसेंबर दरम्यान सुवर्ण विधान सौध येथे राज्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *