महत्वाची कागदपत्रे, मालमत्ता, मौल्यवान वस्तू ताब्यात
बंगळूर : कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मंगळवारी राज्यातील विविध भागात अकरा सरकारी अधिकाऱ्यांच्या ४० ठिकाणावर छापे टाकले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
बेळगाव, हावेरी, दावणगेरे, गुलबर्गा, म्हैसूर, रामनगर आणि धारवाडसह अनेक अधिकाऱ्यांशी संबंधित विविध ठिकाणी सकाळी छापे टाकण्यात आले आणि कागदपत्रे, मालमत्ता आणि मौल्यवान वस्तू तपासल्या जात आहेत.
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धारवाडमध्ये तीन, बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यात दोन, गदग जिल्ह्यातील नरगुंद येथे एक, बिदर, दावणगेरे आणि म्हैसूरमध्ये एकाच वेळी छापे टाकले आहेत.
लोकायुक्त अधिकाऱ्यांनी बिदर जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे अधिकारी रवींद्र रोट्टे यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर छापे टाकले आणि रेकॉर्ड तपासले. या छाप्याचे नेतृत्व लोकायुक्त डीवायएसपी हनुमंता यांनी केले. रवींद्र रोट्टे यांनी यापूर्वी बिदर जिल्हाधिकारी कार्यालयात शिरस्तेदार आणि बीबीएमपीमध्ये अधिकारी म्हणून काम केले होते.
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील ग्राम लेखापाल विठ्ठल दावळेश्वर यांच्या घरावर व कार्यालयावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकून तपासणी केली. विठ्ठल दावलेश्वर याला यापूर्वी चिक्कोडी ते बागलकोटपर्यंत १.१० कोटी रुपयांची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले होते. त्याचाच सिलसिला म्हणून हा छापा झाला.
बेकायदेशीरपणे मालमत्ता खरेदी केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी म्हैसूरमहापालिकेचे विभागीय आयुक्त नागेश यांच्या घरावर आणि कार्यालयावर छापे टाकले आहेत. तसेच श्रीरंगपट्टण येथील नागेशच्या आणखी एका घरावर लोकायुक्तांनी छापा घातला होता. नागेश हे यापूर्वी श्रीरंगपट्टणाचे तहसीलदार होते.
धारवाडच्या गांधीनगर वसाहतीतील केआयएडीबी सहाय्यक कार्यकारी अभियंता गोविंदप्पा बजंत्री यांच्या घरावर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी छापा टाकला. घरासमोर उभ्या असलेल्या दोन गाड्याही तपासल्या. संवदत्ती तालुक्यातील हुली गोविंदप्पा बजंत्री यांच्या जावयाच्या घरावर, धारवाडच्या तेजस्वीनगर वसाहतीतील उगारगोळ फार्महाऊस, लक्कमनहळ्ळी वसाहत येथील केआयएडीबी कार्यालयावर छापे टाकून बेकायदेशीर मालमत्ता ताब्यात घेतली.
तसेच नरगुंद येथील भावाच्या घरावर डीवायएसपी व्यंकनगौडा पाटील यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला.
दावणगेरेच्या डीसीएमशेजारी शक्तीनगरच्या तिसऱ्या क्रॉसवर कमलराज यांचे घर आहे. दावणगेरे लोकायुक्त एसपी एम. एस. कौलापुरे यांच्या देखरेखीखाली निरीक्षक मधुसूदन आणि प्रभू यांच्यासह दहाहून अधिक कर्मचाऱ्यांनी हा छापा घातला.
अभियंत्यांने फेकले पैशाचे गाठोडे
लोकायुक्तांच्या छाप्याला घाबरून हावेरी जिल्ह्याच्या ग्रामीण पेयजल पुरवठा विभागाच्या हिरेकेरूर उपविभागाचे सहायक अभियंता काशिनाथ बजंत्री यांना नऊ लाख रुपयाचे गाठोडे बाहेर फेकून दिले.
कौलापुरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बसवेशनगर येथील पहिला क्रॉस येथील बजंत्री यांच्या घरी छापा टाकल्याची घटना आज सकाळी घडली.
लोकायुक्त अधिकारी घरासमोर येऊन दार ठोठावताच बजंत्रीला धक्का बसला. अचानक खोलीत जाऊन नऊ लाख रुपये घेतले. त्याने रोकड गाठीत बांधून शौचालयाच्या खिडकीतून बाहेर फेकली.
दावणगेरे जिल्ह्यातील उद्योग व वाणिज्य विभागाचे सहायक संचालक कमल राज यांच्या निवासस्थानावर आणि कार्यालयावर लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकला.
दरवाजा उघडल्यानंतर अधिकारी आत आले असता त्यांना पैशांचे बंडल आढळून आले. दोन लाख रुपये बेडवरच मिळाले. याशिवाय एकूण १४ लाख रुपये सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह अनेक महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली असून लोकायुक्त पोलिसांनी तपास हाती घेतला आहे.