मतदानासाठी तयारी पूर्ण
बंगळूर : राज्यातील चन्नपट्टण, शिग्गावी आणि संडूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. १३) मतदान होत असून निवडणूक आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी सर्व व्यवस्था केली आहे.
मतदानाच्या पूर्वसंध्येला उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी शेवटच्या क्षणी डावपेच आखले असून मतदारांची मने जिंकण्यासाठी सर्व युक्त्या केल्या आहेत. पोटनिवडणुकीसाठी चुरशीची लढत होत असून मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तिन्ही मतदारसंघात कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षेसाठी अधिक पोलिस तैनात करण्यात आले आहेत. चन्नपट्टण, शिग्गावी आणि संडूर विधानसभा मतदारसंघात मतदानासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून उद्या सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान होणार आहे.
मतदान क्षेत्रात मद्यविक्रीला बंदी आहे आणि आयोगाने मुक्त आणि निष्पक्ष मतदानासाठी सर्व व्यवस्था केली आहे.
एकूण २,३७,५२५ मतदार असलेल्या शिग्गावी मतदारसंघात काँग्रेसचे युसूफ अहमद पठान आणि भाजपचे भरत बोम्मई यांच्यात लढत आहे. यामध्ये १,२१,४४३ पुरुष मतदार, १,१६,०७८ महिला मतदार आणि सहा तृतीय लिंग मतदार आहेत.
शिग्गावीत मतदानासाठी २४१ मतदान केंद्रे उभारण्यात आली आहेत. यापैकी ९२ सूक्ष्म मतदान केंद्रे म्हणून ओळखली गेली आहेत. संवेदनशील मतदान केंद्रासाठी १० निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून १२ मतदान केंद्रांसाठी वेबकास्टिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
एकूण १०६० अधिकारी शिग्गावी येथे निवडणुकीच्या कामासाठी तैनात करण्यात आले आहेत.
सांडुरमध्ये तयारी
सांडूर मतदारसंघात काँग्रेसच्या अन्नपूर्णा तुकाराम आणि भाजपचे बंगारू हनुमंतू यांच्यात लढत असून, एकूण २,३६,१०० मतदार आहेत. त्यामध्ये १,१८,२८२ महिला मतदार, १,१७,७८९ पुरुष, २९ तृतीय लिंग मतदार आहेत.
संडूर येथे पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी २५३ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून त्यापैकी ५५ मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून ओळखली गेली असून मतदानासाठी १२१५ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
चन्नापट्टणममध्येही व्यवस्था
२,३२,८३६ मतदार असलेल्या चन्नापट्टण मतदारसंघात काँग्रेसचे सी. पी. योगेश्वर आणि धजदचे निखिल कुमारस्वामी यांच्यात लढत आहे. त्यामध्ये १,१२,२७१ पुरुष मतदार, १,२०,५५७ महिला मतदार आणि आठ तृतीय लिंग मतदारांचा समावेश आहे.
या तीन मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. २३ रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर होणार आहे.