इच्छुकांची नाराजी
बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळ पुनर्रचनेचे वृत्त फेटाळून लावले. प्रसार माध्यमे काल्पनिक बातम्या प्रसारित करीत असून त्यामध्ये कोणतेच तथ्य नसल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रीय राजधानीत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराबाबत मी राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी चर्चा केलेली नाही. माजी मंत्री नागेंद्र मंत्रिमंडळात सामील होतील. पण आता नाही, असे ते म्हणाले.
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या बातम्या प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्या आहेत. संभाव्य मंत्र्यांची यादीही प्रसिद्ध केली जात आहे. त्यामुळे पुनर्रचना आणि विस्ताराबाबतच्या प्रश्नांची उत्तरे माध्यमांनी द्यायला हवीत, असे ते म्हणाले.
सिद्धरामय्या यांच्या मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत, अनेक मंत्र्यांना वगळले जाणार आहे, कांही नवीन आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे वृत्त प्रसारित होताच अनेक नेते गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाले.
मी पोलिस खात्यात असतो तर आतापर्यंत डीवायएसपी झालो असतो. राजकारणात मी अनेक वर्षे आहे, मला आता मंत्रीपद हवे आहे, असे मागडीचे आमदार एच. सी. बालकृष्ण म्हणाले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मला मंत्रीपद देण्याचे आश्वासन दिले आहे, असे ते म्हणाले.
मात्र, सध्यातरी या सर्वांच्याच पदरी निराशाच पडणार आहे. दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले असून, सध्या मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा मंत्रिमंडळ फेरबदल होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिल्लीत सांगितले की, “जेव्हा मंत्रिमंडळ विस्तार करण्याची संधी असेल तेव्हा ती होईल. आता ती संधी आलेली नाही. एक मंत्रीपद रिक्त आहे आणि ते भरण्याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही.”
…मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीही स्पष्टीकरण दिले आहे की, “मंत्रिमंडळाची पुनर्रचना आणि विस्ताराबाबत राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी कोणतीही चर्चा झालेली नाही. खुद्द प्रसारमाध्यमे याबाबतचे वृत्त प्रसारित करत आहेत. संभाव्य मंत्र्यांची यादीही प्रसिद्ध केली जात आहे. त्यामुळे मीडियाने पुनर्रचना आणि विस्ताराबाबत प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे सांगून सिद्धरामय्या यांनी निराशा व्यक्त केली.
डॉ. परमेश्वर यांनी राज्याचे गृहमंत्री या नात्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रतिक्रिया दिली. कोणते खाते बदलेल हे माहित नाही, कोणतेही खाते आपण सांभाळण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले.
केपीसीसी अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले मंत्री के. एन. राजण्णा आणि सतीश जारकीहोळी यांची नावे समोर आल्याबद्दल डी. के. शिवकुमार यांना विचारण्यात आले असता, समोरच्या राजकारणावर चर्चा करणे कोणत्याही पक्षाला किंवा कोणासाठीही योग्य नाही, असे त्यांनी मत मांडले.
Belgaum Varta Belgaum Varta