बंगळूर : नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित पार्ट्या आणि इतर ठिकाणी मद्याला मोठी मागणी होती. थर्टी फर्स्टच्या केवळ अर्ध्याच दिवसात राज्य पेय महामंडळाने ३०८ कोटींची मद्यविक्री केली. यातून कोट्यवधींचा अबकारी कर वसूल झाला. गतवर्षी १९३ कोटींची मद्यविक्री झाली होती. त्या तुलनेत यंदा दीडपट अधिक विक्री झाली.
मंगळवारी (दि. ३१) राज्यातील बहुतेक ठिकाणी नववर्ष साजरे करण्यासाठी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी मद्य आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थांची रेलचेल होती. या दिवशी दुपारी २ पर्यंत उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार ३०८ कोटींची मद्यविक्री झाली. अबकारी खात्याने २५० कोटींचे मद्य विकले जाईल, असा अंदाज वर्तवला होता. पण, त्यापेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला. गतवर्षी याचवेळी थर्टी फर्स्टनिमित्त एकूण १९३ कोटींची मद्यविक्री झाली होती. यावर्षी ७,३०५ विक्रेत्यांनी पेय महामंडळाकडून मद्य खरेदी केले.
आयएमएलच्या ४,८३,७१५ बॉक्सच्या विक्रीतून २५०.२५ कोटी रुपये, २,९२,३३९ बिअर बॉक्स विक्रीतून ५७.७५ कोटी रुपये, ७,७६,०४२ बॉक्स मद्यविक्री झाली असून एकूण ३०८ कोटींचे उत्पन्न मिळाले.
नववर्षानिमित्त गेल्या शुक्रवारी (दि. २७) विक्रमी ४०८.५८ कोटींचे मद्य विक्रेत्यांनी खरेदी केले होते. आयएमएलच्या ६,२२,०६२ बॉक्स विक्रीतून ३२७.५० कोटी रुपये, बिअरच्या ४,०४,९९८ बॉक्स विक्रीतून ८०.५८ कोटी रुपये, असे एकूण १०,२७,०६० बॉक्सच्या विक्रीतून एकूण ४०८.५८ कोटींचे उत्पन्न मिळाले.