Monday , December 8 2025
Breaking News

विधिमंडळ बैठकीत पक्षांतर्गत गटबाजी उघड; जारकीहोळी-हेब्बाळकर यांच्यात बाचाबाची

Spread the love

 

बंगळूर : काँग्रेसच्या विधिमंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्यातील नाराजीचा स्फोट झाला आणि प्रदेश काँग्रेसमध्ये सर्व कांही ठीक नाही हे पुन्हा एकदा समोर आले.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यातील दुफळीचे राजकारण सुरवातीपासूनच धुमसत आहे. दोघेही आपापल्या अनुयायांना किंवा समर्थकांना समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. काल विधिमंडळ बैठकीतही अशाच घडामोडी घडल्या आणि त्यावर सतीश जारकीहोळी यांनी लगेच प्रतिक्रिया दिल्याने गोंधळ उडाला.
केपीसीसीचे अध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी पक्षाचे आमदार, मंत्री आणि विशेषतः जिल्हा पालकमंत्र्यांनी काँग्रेस संघटनेवर अधिक भर द्यावा. पक्ष कार्यालये बांधण्याकडे अधिक लक्ष द्यावे, अशी भूमिका मांडली.
यावेळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेळगाव जिल्ह्यातील पक्ष कार्यालयाच्या बांधकामाचे उदाहरण देत, आपण मंत्री झाल्यानंतर इमारत बांधकामाला गती आल्याचे सांगितले. त्यावर बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी आपल्याला चुकीची माहिती दिली जात असल्याचे सांगून हेबाळकरांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला.
यापूर्वी काँग्रेसचे मंत्री असलेले रमेश जारकीहोळी यांनी बेळगावमध्ये जिल्हा काँग्रेस कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिली असून, इमारतीच्या बांधकामासाठी त्यांनी ३ कोटी रुपये दिले आहेत. मी स्वतःचे पैसे खर्च केले आहेत. केपीसीसी अध्यक्षांनी तथ्य लपवून चुकीची माहिती दिली तर ती स्वीकारली जाऊ शकत नाही, असे सांगितले.
यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मध्येच हस्तक्षेप करून आपण मंत्री झाल्यानंतर इमारतीच्या बांधकामाशी संबंधित प्रलंबित आर्थिक सुविधा उपलब्ध करून दिल्याचे सांगितले, तसेच वीज बिल, पाणी बिल मिळून अंदाजे सात कोटीची साधने दानशूर व्यक्तीकडून उपलब्ध करून दिल्याचे सांगितले.
काँग्रेस सदस्यांमध्ये तणाव स्पष्टपणे वाढत असताना, एआयसीसीचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनी हस्तक्षेप केला आणि दोन्ही मंत्र्यांना पक्ष ऐक्यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.
परिस्थिती आपत्तीत वळत असल्याचे लक्षात घेऊन मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, सर्वांनी एकत्र काम केले आणि इमारत पूर्ण झाली. ऑफिस मिळाले. ही आनंदाची बाब आहे. यापुढे कोणतीही चर्चा करू नये, असा सल्ला देण्याबरोबरच अन्य जिल्ह्यांमध्येही काँग्रेस कार्यालयाच्या बांधकामासाठी सहकार्य करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
बेळगाव जिल्ह्याचे राजकारण काँग्रेसमध्ये नेहमीच वादाच्या केंद्रस्थानी राहिले आहे. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील धजद-काँग्रेस आघाडी सरकारच्या पतनाला बेळगाव जिल्ह्याचे राजकारण कारणीभूत होते.
लक्ष्मी हेब्बाळकर यांचा जिल्ह्यातील अपक्ष नेत्यांचा पाठींबा मिळवून जारकीहोळी बांधवांवर हल्लाबोल करण्याचा प्रयत्न अनेक वर्षांपासून सुरू आहे. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना पाठिंबा दिल्याने बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात नाराजी पसरली आहे.
सतीश जारकीहोळी व लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील मतभेद पक्षीय पातळीवर पुन्हा एकदा समोर आले आहेत. पक्ष संघटित असल्याचे नेते सांगत असले तरी अंतर्गत मतभेद अजूनही मिटले नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *