बंगळूर : चार दरोडेखोरांच्या टोळीने म्हैसूर जिल्ह्यात केरळच्या एका व्यावसायिकावर हल्ला केला आणि त्याची कार आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला, असे अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले.
हे कृत्य एका वर्दळीच्या रस्त्यावर दिवसाढवळ्या घडले आणि काही वाटसरूंनी घेतलेल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. त्यामुळे राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी म्हैसूर जिल्ह्यातील जयपुर विभागातील हरोहळ्ळी गावात चार मुखवटा घातलेल्या व्यक्तींच्या गटाने केरळमधील अश्रफ या व्यावसायिकाची फोर्ड इको स्पोर्ट मोटार अडवली. दरोडेखोरांनी व्यापारी व चालकाला वाहनातून बाहेर ओढले आणि धमकावत ढकलले. त्यानंतर दीड लाखांची रोकड असलेली बॅग हिसकावून घेत कारसह पलायन केले. कर्नाटकातून केरळला जात असलेल्या अश्रफने पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर जयपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत गुन्हा दाखल केला. केरळला जाणाऱ्या सर्व चेक पोस्टना पोलिसांनी कळवले असून ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत.
मागच्या आठवड्यात बिदरमध्ये भरदिवसा एटीएम भरणाऱ्या एजन्सीच्या कर्मचाऱ्यांवर दरोडेखोरांनी गोळ्या झाडून दोघांची हत्या करून ९३ लाखांची रक्कम लुटली होती, विजयपूरमध्ये दरोडा आणि मंगळुरूच्या उल्लाळ येथे सहकारी बँकेवर दरोडा पडला. या घटना ताज्या असतानाच आज केरळमधील एका व्यावसायिकाची कार अडवून लुटण्यात आल्याने सार्वजनिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
Belgaum Varta Belgaum Varta