बंगळूर : उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यात भाजपच्या विजयाचा कर्नाटकातील पक्षावर सकारात्मक प्रभाव पडेल, असे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, निकालाने कर्नाटकातील पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. २०२३ च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या निवडणुकीतील विजयांचा कर्नाटकातील भाजपवर सकारात्मक प्रभाव पडेल, असे ते म्हणाले.
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील कार्यक्रम गरीब समर्थक, शेतकरी समर्थक आणि महिला समर्थक आहेत. लोकांनी आम्हाला कोविड-१९ महामारी हाताळण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेच्या पुनरुत्थानासाठी प्रोत्साहन दिले आहे. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या ‘डबल इंजिन सरकार’ने उत्तर प्रदेशात पुनरागमन केले आहे. कर्नाटकातही, आम्ही आधीच अर्थसंकल्पात लोकाभिमुख कार्यक्रमांची मालिका जाहीर केली आहे, जी पुढील एका वर्षात अंमलात आणली जाईल, ज्यामुळे आम्हाला पुढील निवडणुका जिंकण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.
एप्रिलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कर्नाटकचा दौरा करतील, तेव्हा राज्य सरकारचे यश त्यांच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
येडियुरप्पा माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर भाजप नेत्यांचे विशेषत: उत्तर प्रदेशमधील विजयाबद्दल अभिनंदन केले. ते म्हणाले की, भारतातील बहुतेक भागांमध्ये काँग्रेसने आधार गमावला आहे आणि लवकरच राजकीय दृश्यातून नाहीसा होईल.
कुमारस्वामीनी काँग्रेसला फटकारले
धजद नेते आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी म्हणाले की, ज्या पक्षांना आपण कर्नाटकात सत्तेवर आल्याचे आधीच वाटत आहे अशा पक्षांना हा निकाल धक्का देणारा आहे.
ते म्हणाले की धजदला संपवण्याच्या तयारीत असलेल्या नेत्यांनाही निकालांनी धडा शिकवला आहे. ते म्हणाले, निकालांनी हे सिद्ध केले आहे की केवळ धजद सारखा प्रादेशिक पक्षच भाजपशी सामना करण्यास सक्षम आहे.
गुरुवारचा निकाल हा १०० वर्षांचा इतिहास असलेल्या कॉंग्रेस पक्षाला आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा आहे, असे ते म्हणाले, कॉंग्रेस गोवा आणि पंजाबमध्ये सरकार स्थापन करण्याबाबत आत्मविश्वास व्यक्त करत आहे.
पंजाबमधील निकाल आणि पश्चिम बंगालमधील पूर्वीचे निकाल हे धजदसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगून, कुमारस्वामी म्हणाले की, पक्ष पुढील निवडणुका कर्नाटकातील सिंचन मुद्द्यांच्या आधारावर लढवेल. ते पुढे म्हणाले, ज्या पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, त्यांची परिस्थिती कर्नाटकातील परिस्थितीपेक्षा वेगळी आहे.