
बेंगळुरू : महाराष्ट्रात मराठी भाषा बोलण्यास सक्तीचे केल्याने त्याचे देशभर पडसाद उमटतात. मराठी लोक भाषेसाठी दादागिरी करत असल्याची आवई उठवली जाते. पण आता कर्नाटकातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक महिला थेट बँकच्या महिला मॅनेजरलाच कन्नडमध्ये बोलण्यास सांगितले. मॅडम, हे कर्नाटक आहे. त्यामुळे तुम्ही आमच्याशी कन्नडमध्येच संवाद साधा असे ग्राहकाने महिलेला सुनावले. भाषेवरून दोघांमध्ये बरीच वादावादी झाली. या वादावादीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. बाहेरील लोक स्थानिक भाषेचा कसा अवमान करतात, हेच या व्हिडीओतून समोर आले आहे. दक्षिण बंगळुरूच्या चंदपुरा येथे ही घटना घडली. एक महिला बँकेत आली होती. ही महिला बँक मॅनेजर महिलेशी कन्नडमध्ये बोलत होती. पण मॅनेजर महिलेने हिंदीत बोलण्यास सुरूवात केली आणि ग्राहक महिलेलाही हिंदीत बोलण्यास सांगितले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.

हा भारत आहे, फक्त हिंदी बोलणार
या व्हिडीओतील संवाद स्पष्टपणे ऐकू येतोय. कस्टमर महिलाने मॅनेजर महिलेला बरंच सुनावल्याचे दिसत आहे. हे कर्नाटक आहे. त्यामुळे तुम्हाला कन्नड बोलले पाहिजे, असे ही कस्टमर महिला म्हणाली. कन्नडमध्ये बोला मॅडम. हे कर्नाटक आहे, असे कस्टमर महिला बोलताना दिसते. तर त्यावर तर? हा भारत आहे. मी फक्त हिंदीतच बोलेल, असं महिला मॅनेजर बोलताना दिसत आहे. त्यानंतर कस्टमर महिलेने मॅनेजर महिलेला आरबीआयच्या गाईडलाईनच दाखवल्या. त्यात ग्राहकांशी स्थानिक भाषेतच संवाद साधण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे. महिलेने ही गाईडलाईन दाखवताच मॅनेजर महिलेने कोणतेच उत्तर दिले नाही. मात्र, तिने उलट उत्तर दिले. तू काही मला नोकरी दिली नाही, असे महिला मॅनेजर म्हणताच कस्टमर महिला भडकली. दोघींमध्ये बराच वाद झाला. मी कन्नडमध्ये बोलणारच नाही, असा तगादाच मॅनेजरने लावला. त्यावर सुपर, मॅडम, सुपर, असे म्हणत ग्राहक महिलेने टोला लगावला.

संमिश्र प्रतिक्रिया
या वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. व्हिडीओ आल्यानंतर लोकांमध्ये नाराजी पसरली आहे. नेटिजन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. कोणीही कुणावर स्थानिक भाषा थोपवू शकत नाही. लोक आपल्या इच्छेनुसार भाषा बोलतात, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली आहे. तर कन्नडमध्ये बोलण्यास ज्या पद्धतीने नकार दिला, ते मॅनेजरचे असभ्यपणाचे लक्षण होते, असे काहींनी म्हटले आहे. काहींनी मात्र, आपण ज्या राज्यात राहतो, तिथल्या भाषेचा सन्मान केलाच पाहिजे. तिथली भाषा शिकली पाहिजे आणि त्या भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. एखादी एक्स्ट्रा भाषा शिकले तर बिघडले कुठं? असा सवाल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कन्नड कार्यकर्त्यांच्या एका गटाने बँकेच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या मेन शाखेपर्यंत मोर्चा काढून निवेदन देण्याचा निर्णयही या गटाने घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात कन्नडमध्येही भाषिक वाद पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta