बंगळुरू : राज्यभर सामाजिक व शैक्षणिक सर्वेक्षण सुरू झालं असून, प्रारंभी काही तांत्रिक अडचणींमुळे या कामात विलंब झाला. आता त्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या असून, सर्वेक्षणाच्या गतीस चालना द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कृष्णा येथील व्हिडीओ कॉन्फरन्समधून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले. १.४३ कोटी कुटुंबांचं सर्वेक्षण हे ऑक्टोबर ७ पर्यंत पूर्ण करायचं असून, आतापर्यंत फक्त २.७६ लाख कुटुंबांची नोंदणी झाली आहे. या कामासाठी १.२० लाखांहून अधिक गणक नियुक्त करण्यात आले असून, १.२२ लाख गणना ब्लॉक्स निश्चित आहेत. शिक्षकांनी जबाबदारीनं काम करावं, कसूर करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. मानधन आधीच वितरित करण्यात आलं असून, शिक्षकांनी संभ्रम न ठेवता सक्रिय सहभाग घ्यावा. सर्वेक्षणाच्या कामात तांत्रिक अडचणी उद्भवल्यास तत्काळ उपाययोजना करावी, अशी सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी दिली आहे.
ही मोहीम केवळ मागासवर्गीय कल्याण खात्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण राज्यासाठी महत्त्वाची आहे. महसूल, पंचायत राज आणि नगर स्थानिक संस्थांनी परस्पर समन्वय साधावा. बेंगळुरू शहरात सर्वेक्षणाला सुरुवात झाली असून, बीबीएमपी हद्दीत ५० लाख घरांचं लक्ष्य आहे. डोंगराळ भागात केंद्रं सुरू करण्यास परवानगी असून, ऑनलाईन सहभागाचीही सोय उपलब्ध आहे. प्रत्येक तालुक्यात नोडल अधिकारी नेमावा, दररोज किमान १० टक्के प्रगती साधावी आणि प्रत्येक घराचं सर्वेक्षण सुनिश्चित करावं, अशा शब्दांत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट सूचना दिल्या
Belgaum Varta Belgaum Varta