

बंगळूर : राज्यातील सर्व सरकारी आणि अनुदानित शाळांना दसऱ्याची सुट्टी आता १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर केला.
मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कायमस्वरूपी मागासवर्ग आयोगातर्फे राज्यात सुरू असलेले सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण काही ठिकाणी अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आणखी दहा दिवस सुटी वाढविण्याचा निर्णय घेतला.
सुटीचा निर्णय पत्रकार परिषदेत जाहीर करताना मुख्यमंत्री सिध्दरामय्या म्हाणाले की, काही जिल्ह्यांमध्ये सर्वेक्षणाचे काम जवळजवळ पूर्ण झाले आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ते अद्याप पूर्ण झालेले नाही. कोप्पळ जिल्ह्यात ९७ टक्के, उडुपीमध्ये ६३ टक्के आणि दक्षिण कन्नड जिल्ह्यात ६० टक्के सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे.
शालेय शिक्षकांच्या विनंतीवरून कारवाई: आम्ही ७ ऑक्टोबर रोजी सर्वेक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. तथापि, राज्यातील अनेक भागात अपेक्षेप्रमाणे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झालेले नाही. राज्यातील १.२० लाख शिक्षक सर्वेक्षणाच्या कामात सहभागी होते. राज्य शिक्षक संघटनेने सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यासाठी दसऱ्याची सुट्टी वाढवण्याची विनंती केली होती. या विनंतीवरून, सुट्टी १८ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले.
परीक्षेच्या कामात सहभागी असलेले शिक्षक सर्वेक्षणाला उपस्थित राहू शकत नाहीत. बारावी (द्वितीय पीयूसी) परीक्षा सुरू आहे, आणि परीक्षेत सहभागी असलेले सर्वेक्षणात सहभागी होऊ शकत नाहीत. सुटीची मुदतवाढ १२ दिवसांची असेल, सर्वेक्षण १८ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करावे लागेल. सर्वेक्षणात सहभागी असलेल्या शिक्षकांना ८ कामकाजाचे दिवस आणि इतर सरकारी सुट्ट्या मिळतील. सर्वेक्षणाच्या कामात विलंब करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला.
मृतांच्या कुटुंबाना २० लाखाची भरपाई
सर्वेक्षणाच्या कामादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या कुटुंबियांना २० लाख रुपयांची भरपाई देण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बंगळूरमध्ये ६,७०० शिक्षक
बंगळूरमध्ये ४६ लाख घरे आहेत आणि सर्वेक्षणासाठी ६,७०० शिक्षक तैनात करण्यात आले आहेत. एकूण २७ हजार प्रगणक तैनात करण्यात आले आहेत. दररोज १०-१५ घरांचे सर्वेक्षण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नरक चतुर्दशीपर्यंत बंगळूरमध्ये सर्वेक्षण पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तोपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आश्वासनही शिक्षकांनी दिले आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta