

बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आगामी काळात मंत्रिमंडळात फेरबदल होणार असल्याचे संकेत दिले असून, त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाबाबत कोणतीही अनिश्चितता नसल्याचा ठोस संदेश त्यांनी काँग्रेस पक्षात दिला आहे.
महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त बंगळूर येथील आमदार भवनात वाल्मिकी पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिद्धरामय्या म्हणाले, “भविष्यात मंत्रिमंडळात फेरबदल केले जातील. त्यावेळी वाल्मिकी समुदायाला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
अनुसूचित जातीतील वाल्मिकी आमदाराला मंत्रिपद देण्याच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या या प्रतिक्रियेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण राज्यात नोव्हेंबर महिन्यात सत्तावाटप करार लागू होईल, अशा चर्चांना याच काळात उधाण आले आहे.
यापूर्वी म्हैसूर दसऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी “मी पुढील अडीच वर्षे मुख्यमंत्री राहीन,” असे वक्तव्य केले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये नेतृत्व बदल आणि सत्तावाटपाच्या चर्चांना चालना मिळाली होती. मात्र, सिद्धरामय्या यांचे समर्थक आमदार आणि मंत्र्यांनी ते पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे स्पष्ट केले. त्याउलट, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांनी भविष्यात शिवकुमार यांनी मुख्यमंत्री व्हावे, अशी मागणी केली.
या चर्चांवर पडदा टाकण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी “नेतृत्व बदलाबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही,” असे सांगितले. उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही सत्तावाटपाबाबत बोलणे पक्षविरोधी असल्याचे ठामपणे नमूद करत, अशा आमदारांना नोटिसा बजावण्याचे निर्देश दिले. त्यानुसार कुनिगलचे आमदार डॉ. रंगनाथ यांना नोटीस देण्यात आली आहे.
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलेले मंत्रिमंडळ फेरबदलाचे संकेत हे त्यांच्या नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याचे आणि राज्यकारभारावर त्यांचे नियंत्रण कायम असल्याचे सूचित करतात.
Belgaum Varta Belgaum Varta