

वन्यजीव सप्ताहाचा समारोप
बंगळूर : राज्यात वन्यजीवांच्या हत्यांबाबत वाढत्या घटनांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कठोर इशारा दिला आहे. “वाघ, हत्ती किंवा कोणत्याही वन्यजीवांचा जीव घेणाऱ्यांविरुद्ध सरकार कठोर कायदेशीर कारवाई करेल,” असे ते बुधवारी म्हणाले.
चामराजनगर जिल्ह्यातील माले महाडेश्वर टेकड्यांमध्ये दोन वाघ आणि चार पिल्लांना विषबाधा झाल्याची तसेच रामनगर जिल्ह्यातील चन्नपटण येथे एका हत्तीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना पार्श्वभूमीवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
विधानसौध येथील बँक्वेट हॉलमध्ये आयोजित ७१ व्या वन्यजीव सप्ताह समारोपप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “जर जंगले टिकली, तर पृथ्वी टिकेल. जंगले आणि वन्यजीव अविभाज्य आहेत. त्यांचा नाश करणाऱ्यांना कायद्याला सामोरे जावे लागेल.”
वाघांनी गुरे मारल्याच्या कारणावरून त्यांना विषबाधा देणे असह्य असल्याचे सांगत सिद्धरामय्या म्हणाले, “अशा घटनांना सरकार कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. जो कोणी जंगल नष्ट करेल किंवा वन्यजीवांचा जीव घेईल, तो कितीही प्रभावशाली असला तरी कायदा त्याला वाचवणार नाही.”
मुख्यमंत्र्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना अधिक दक्षतेने आणि जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले. “वाघ किंवा कोणत्याही वन्यजीवांना मारणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल,” असा त्यांनी पुनरुच्चार केला.
ते पुढे म्हणाले, “वनक्षेत्राचा सतत होणारा ऱ्हास मानवी अस्तित्वालाच धोका निर्माण करतो. जंगले वाचवणे म्हणजे मानवतेचे रक्षण करणे, हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे.”
मुख्यमंत्र्यांच्या भाषणात त्यांनी मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्वावर भर दिला. “कर्नाटक हत्तींच्या संख्येत देशात पहिल्या आणि वाघांच्या संख्येत दुसऱ्या क्रमांकावर आहे. वन्य प्राणी जंगलातून बाहेर का येतात हे समजून घेण्यासाठी आणि संघर्ष रोखण्यासाठी वैज्ञानिक उपाय शोधले पाहिजेत,” असे ते म्हणाले.
या प्रसंगी राज्याचे वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी वन अधिकाऱ्यांना वनजमिनीवरील अतिक्रमण रोखण्यासाठी प्रामाणिकपणे आणि वचनबद्धतेने काम करण्याचे आवाहन केले. “सध्या वनक्षेत्र वाढवणे कठीण आहे. त्यामुळे विद्यमान जंगले जपणे हीच खरी प्राथमिक जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.
हवामान बदल आणि वाढते तापमान निसर्गासाठी गंभीर धोका असल्याचे नमूद करत खांड्रे यांनी जनतेला पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.
खांड्रे यांनी माहिती दिली की बनरघट्टा जैविक उद्यानात एक मेगावॅट क्षमतेचा कॅप्टिव्ह सौरऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. “हे देशातील पहिले पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारे पर्यावरणपूरक जैविक उद्यान ठरेल आणि पुढील आठवड्यात त्याचे उद्घाटन होईल,” असे ते म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta