
पोलिस आयुक्त सीमांत कुमार; ५.७६ कोटी रुपये जप्त
बंगळूर : राज्याला हादरवून सोडणाऱ्या बंगळुर एटीएम कॅश व्हॅन दरोडा प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून ५.७६ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत, अशी माहिती शहर पोलिस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
७.११ कोटींच्या कॅश ट्रान्सफरदरम्यान झालेल्या या दरोड्यात एकूण आठ जण सहभागी होते. तपासामध्ये आतापर्यंत तिघांना अटक झाली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांना या घटनेची माहिती प्रत्यक्ष घटनेनंतर दीड तास उशिरा मिळाली. माहिती मिळताच शहरभर नाकाबंदी करण्यात आली.
पोलिस आयुक्तांनी सांगितले की, “गुन्हेगार मोबाईलचा वापर करत नव्हते. त्यांनी आपली वाहने सीसीटीव्ही नसलेल्या ठिकाणी उभी केली होती. तपासाची दिशाभूल करण्यासाठी ते वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलत होते. घटनेच्या दिवशी कॅश घेऊन जाणारे वाहन पकडता आले नाही. त्यांनी अनेक वाहने वापरली आणि क्रमांक प्लेट्सही वारंवार बदलल्या.”
११ विशेष पथके, पाच राज्यांत शोधमोहीम
गुन्ह्याचा तपास करण्यासाठी ५ राज्यांमध्ये शोधमोहीम राबवण्यात आली असून एकूण ११ पथके तयार करण्यात आली आहेत. एका पोलिस कॉन्स्टेबलसह तीन जणांना विशेष माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. पहिल्या २४ तासांत आरोपींची ओळख आणि त्यांनी वापरलेली वाहने शोधण्यात पोलिसांना यश आले.
आयुक्तांनी सांगितले की, आरोपी सीसीटीव्ही नसलेल्या भागातून वारंवार मार्ग बदलत होते. केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवा येथे त्यांचा शोध सुरू आहे. आतापर्यंत ३० हून अधिक संशयितांची चौकशी करण्यात आली असून अजूनही काही रक्कम जप्त करायची आहे.
माजी कर्मचारी आणि कॉन्स्टेबल अटकेत
गोविंदपूरम येथील एका पोलिस कॉन्स्टेबलसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. गोपी, झेवियर आणि अन्नप्पनायक अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी एक आरोपी सीएमएस कंपनीचा माजी कर्मचारी आहे. या टोळीने कोणताही मागोवा न लागावा म्हणून तीन महिन्यांपासून नियोजन केले होते. काही महत्त्वाच्या चुकांमुळे सीएमएस कंपनीवरही चौकशीचा ग्रह आहे. वाहनाचा प्रभारी अधिकारी तसेच आउटसोर्स केलेला चालकही या घटनेत संशयित आहेत.
चित्तूर येथे आरोपींनी वापरलेली इनोव्हा कार आढळली, तर बंगळुरच्या बाहेरील भागातून मोठी रक्कम जप्त करण्यात आली. या तपासात सीसीबीचे डीसीपी, दक्षिण विभागाचे डीसीपी आणि दोन सहपोलीस आयुक्त सहभागी असून संपूर्ण प्रकरण गांभीर्याने हाताळले जात आहे.
Belgaum Varta Belgaum Varta