Sunday , December 7 2025
Breaking News

काँग्रेसमधील सत्ता वाटपाचे वाद निवळले?

Spread the love

 

सिद्धरामय्या–शिवकुमार यांची दुसरी ‘नाश्ता बैठक’

बंगळूर : काँग्रेसमधील सत्तावाटपाचा वाद कमी झाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आठवड्यातील दुसऱ्या ‘नाश्ता बैठकी’त उपस्थित राहून पुन्हा ऐक्याचे दर्शन घडवले. सदाशिवनगर येथील शिवकुमार यांच्या निवासस्थानी दोन्ही नेत्यांनी आज सकाळी एकत्र नाश्ता करत राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा केली.
बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आम्ही नेहमीच एकजुटीने काम केले आहे. हायकमांडच्या सूचनांनुसार पुढे जाऊ. विधानसभा निवडणुकीतही एकत्रितपणे काम करून काँग्रेसला पुनश्च सत्ता मिळवून देऊ.”
८ डिसेंबरपासून बेळगावात सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाबाबत दोन्ही नेत्यांनी रणनीती निश्चित केली. भाजप–धजदकडून अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता असून त्यासाठी सरकार सज्ज असल्याचे ते म्हणाले. विरोधकानी कोणताही मुद्दा उपस्थित केला तरी त्याला ठोसपणे उत्तर देण्यास आम्ही तयार असल्याचे दोघांनी स्पष्ट केले.
उद्या मंगळुरमध्ये होणाऱ्या कार्यक्रमाला काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाल उपस्थित राहणार असून, “जर वेळ मिळाला तर आम्ही त्यांना भेटू,” असे मुख्यमंत्री म्हणाले.
शिवकुमार यांनीही, “पक्षात कोणतेही गट नाहीत. आम्ही सर्वजण एकच आवाज आणि एकच विचारसरणी आहोत,” असे सांगत अंतर्गत कलहाच्या चर्चांना पूर्णविराम दिला.
दिल्लीतील सर्वपक्षीय खासदारांच्या बैठकीबाबत दोघांनी मुंबई–कर्नाटक विभागाशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा केली. केंद्राकडून ग्रामीण विकास, शहरी विकास, शेती, सिंचन प्रकल्प या क्षेत्रांत निधी न मिळाल्याबाबत खासदारांकडून ठोस भूमिका घेण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, भाजप–धजदने सरकारविरोधात केलेल्या निदर्शनांवर टीका करताना सिद्धरामय्या म्हणाले, “ही त्यांची रिकामी ट्रंक आहे.”
आजच्या बैठकीत पदवीधर आणि शिक्षक संघटनांच्या चार विधान परिषद मतदारसंघांसाठी उमेदवार निवडीबाबतही चर्चा झाली. हा मुद्दा प्रदेश प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांच्याशी बोलून निश्चित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नाश्त्याच्या दरम्यान सिद्धरामय्या यांनी ‘नाटिकोळी सूप’ आणि इडलीचा आस्वाद घेतला. शिवकुमार यांच्या कनकपुरातील फॉर्महाऊसमधील जंगली कोंबडीचा रस्सा खास आकर्षण ठरला.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *