Sunday , December 7 2025
Breaking News

इंडिगोची उड्डाणे विस्कळीत; बंगळुरात १०२ उड्डाणे रद्द; प्रवाशांचा चौथ्या दिवशीही उसळला संताप

Spread the love

 

बंगळूर : ऑपरेशनल अडचणींमुळे इंडिगो एअरलाइन्सच्या सेवा चौथ्या दिवशीही विस्कळीत झाल्या असून, आज केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल १०२ उड्डाणे रद्द करण्यात आली. ५२ आगमन आणि ५० निर्गमन रद्द झाल्याने शेकडो प्रवासी विमानतळावर तासन्तास अडकून पडले. काहींना तर १२ तासांपेक्षा जास्त प्रतीक्षा करावी लागली.
विमान उशिरा येणे आणि वेळोवेळी रद्द होणे यामुळे प्रवाशांचा इंडिगोविरोधात तीव्र संताप उफाळून आला आहे. प्रवासी नितीन मालपाणी यांनी एक्सवर व्यक्त केलेल्या नाराजीत म्हटले आहे, “आम्ही काल रात्रीपासून विमानतळावर आहोत. त्यामुळे मुलं, वृद्ध, आजारी लोक यांना त्रास सहन करावा लागला. हे वेळापत्रक बदलण्याचे प्रयोग प्रवाशांवर का?”
दरम्यान, इंडिगोच्या देशभरातील सेवांमध्ये व्यत्यय आल्यामुळे ५०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. थकलेले प्रवासी विमानतळावर कुठेतरी झोप घेऊन वेळ घालवत आहेत. काही प्रवाशांनी तर प्रतीक्षेत भजन गाऊन वेळ काढताना कॅमेऱ्यात टिपले आहेत.

वधू-वरांचा स्वागत समारंभ ऑनलाइन!
उड्डाणे रद्द झाल्याचा फटका एका नवविवाहित जोडप्यालाही बसला. हुबळीतील मेधा क्षीरसागर आणि भुवनेश्वरचे संगमा दास, जे बंगळुरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, यांनी २३ नोव्हेंबरला लग्न केले होते. ३ डिसेंबर रोजी हुबळीतील गुजरात भवनात स्वागत समारंभाची तयारी झाली होती; नातेवाईकही उपस्थित होते.
परंतु, भुवनेश्वर–बंगळुर–हुबळी असे बुक केलेले इंडिगोचे विमान ९ तासांहून अधिक उशिरा येत राहिले आणि शेवटी ३ डिसेंबरच्या सकाळी रद्द करण्यात आले. परिणामी वधू-वर आणि वराचे पालक भुवनेश्वरमध्येच अडकून पडले. त्यामुळे हुबळीतील स्वागत समारंभ ऑनलाइन पार पडला. वधूच्या पालकांनीच समारंभातील पारंपारिक विधी पूर्ण केले.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेमुळे हजारो प्रवाशांची गैरसोय होत असून, उड्डाणे नियमित होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी होणार पूर्वीप्रमाणे तीन परीक्षा; परीक्षा मंडळाचे स्पष्टीकरण

Spread the love  बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *