
बंगळूर : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मूल्यांकन मंडळाने (केएसईएबी) यंदाही दहावी विद्यार्थ्यांसाठी तीन टप्प्यांच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. अलीकडे केवळ पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाल्याने तिसऱ्या परीक्षेबाबत विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मंडळाने अधिकृत निवेदन देत गोंधळ दूर केला.
परीक्षा मंडळाने सांगितले की, २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी दहावी आणि बारावीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यांच्या परीक्षांसाठी तात्पुरता अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून त्यानुसार वेळापत्रकही प्रकाशित करण्यात आले आहे. मात्र तिसऱ्या टप्प्याच्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आले नसले तरी ही परीक्षा निश्चितपणे होणार आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले.
मंडळाने पुढे सांगितले की, तिसऱ्या परीक्षेचे वेळापत्रक हे पहिल्या आणि दुसऱ्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ठरवण्यात येते. त्यामुळे योग्य वेळी तिसऱ्या परीक्षेसाठीची तारीख जाहीर करण्यात येईल.
गेल्या दोन वर्षांपासून कर्नाटकात एसएसएलसी आणि पीयूसीसाठी तीन टप्प्यांच्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या पद्धतीमुळे विद्यार्थी निकालाबाबतची भीती बाजूला ठेवून अधिक आत्मविश्वासाने परीक्षा देऊ लागले आहेत, असे शिक्षण विभागाचे म्हणणे आहे. वर्षातील तीन संधी उपलब्ध असल्याने विद्यार्थ्यांवरचा मानसिक ताणही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे.
यावर्षी फक्त दोन टप्प्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आणि तिसऱ्या टप्प्याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती न मिळाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. अखेर शिक्षण विभागाने दिलेल्या स्पष्टीकरणामुळे हा गोंधळ दूर झाला असून तिसरी परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta