
धारवाड : आय-20 कार गाडीने दुभाजकाला धडक दिल्याने अचानक पेट घेतली. या अपघातात लोकायुक्त सीपीआय पंचाक्षरी सालीमठ यांचा कारमधून बाहेर पडता न आल्याने होरपळून मृत्यू झाला. नुकताच आयएएस अधिकारी महांतेश बेळगी यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखीन एका अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्घटना धारवाडमध्ये घडली आहे. अन्नगिरी तालुक्यातील भद्रापूर येथील गदग हुबळी राष्ट्रीय महामार्गावरील अरेरा पुलाजवळ काल सायंकाळी साडेसात वाजता सदर घटना घडली. कार वरील नियंत्रण सुटल्याने गाडी दुभाजकाला धडकताच गाडीने पेट घेतली. क्षणार्धात आगीने रौद्ररूप घेतले व गाडी पूर्णपणे आगीत भस्मसात झाली. या अपघातात हावेरी येथे लोकायुक्त पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असणारे पंचाक्षरी सालीमठ हे मृत्युमुखी पडले. सालीमठ हे गदग घेतील आपल्या कुटुंबीयांची भेट घेऊन परतत असताना गदग हुबळी महामार्गावर काळाने त्यांच्यावर घाला घातला. सालीमठ हे स्वतः गाडी चालवत होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
अपघाताची माहिती मिळताच अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले होते परंतु त्यापूर्वीच कार गाडी आगीत पूर्णपणे जळून खाक झाली होती. आगीचे रौद्ररूप इतके होते की मृतदेह जळून पूर्णपणे कोळसा झाला होता. मृताची ओळख पटणे देखील कठीण झाले होते. मृताच्या हातातील ब्रासलेटमुळे कुटुंबीयांनी मृतदेहाची ओळख पटविली. कार दुभाजकाला धडकल्यानंतर पेट्रोल टाकीला गळती लागली आणि त्यातून गाडीने पेट घेतला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. अपघात स्थळी धारवाडचे पोलीस अधीक्षक गुंजन आर्य यांनी भेट देऊन पाहणी केली.
Belgaum Varta Belgaum Varta