
बंगळूर : पोलीस गणवेश परिधान करून खऱ्या पोलिसांसारखे वर्तन करत नागरिकांना धमकावून पैसे उकळणाऱ्या बनावट पीएसआयसह चार जणांना विद्यारण्यपूर पोलिसांनी अटक केली आहे. मल्लिकार्जुन, प्रमोद, विनय आणि हृत्विक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तपासात उघड झाले आहे की, आरोपींनी कट रचून घरात घुसखोरी करत धमकी देऊन पैसे आणि मौल्यवान वस्तू लुटल्या. अशाच प्रकारे एका व्यक्तीला धमकावून दरोडा घातल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली.
मुख्य आरोपी मल्लिकार्जुन याने पीएसआय होण्यासाठी दोन वेळा परीक्षा दिली होती; मात्र तो अपयशी ठरला होता. तरीही परीक्षा उत्तीर्ण होऊन पीएसआय झाल्याचा बनाव त्याने आपल्या गावात केला होता. पोलीस गणवेश, लाठी, टोपी आणि बूट घालून फोटोशूट करून घेत, आपण बंगळुरमध्ये पीएसआय म्हणून कार्यरत असल्याचे तो सिरगुप्पा येथील ग्रामस्थांना सांगत होता.
आलिशान जीवनशैलीसाठी मल्लिकार्जुनने गुन्हेगारी मार्ग स्वीकारला होता. या गुन्ह्यात त्याला आरोपी क्रमांक चार असलेल्या हृत्विकने साथ दिली. हृत्विकने नवीन नावाच्या व्यक्तीवर पाळत ठेवून त्याच्या घरात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असल्याची माहिती मल्लिकार्जुनला दिली होती.
या माहितीनुसार, चालू महिन्याच्या ७ तारखेला आरोपी पोलीस गणवेशात कारमधून नवीनच्या घरी गेले. “तू गांजाची विक्री करतोस, घराची झडती घ्यावी लागेल,” अशी धमकी देत त्यांनी नवीनला लाठी व लोखंडी रॉडने मारहाण केली. अटक टाळायची असेल तर पैसे द्यावे लागतील, असे सांगून आरोपींनी त्याच्या खात्यातील ८७ हजार रुपये, कपाटातील ५३ हजार रुपये आणि पर्समधील २ हजार रुपये लुटून पलायन केले.
या प्रकरणी नवीन यांनी विद्यारण्यपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीच्या आधारे कारवाई करत पोलिसांनी बनावट पीएसआयसह चौघांना अटक केली. आरोपींकडून ४५ हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली असून, विद्यारण्यपूर पोलीस पुढील तपास करत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta