Tuesday , March 3 2026
Breaking News

राहुल गांधींसोबत कोणतीही राजकीय चर्चा नाही

Spread the love

 

मुख्यमंत्री सिद्धरामय्या; म्हैसूरमध्ये राहुल गांधींची घेतली भेट

बंगळूर : लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केले. शहरातील विमानतळावर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मंगळवारी म्हैसूरमधील मांडकल्ली विमानतळावर उतरलेल्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे संयुक्तपणे स्वागत केले.

दिल्लीहून तामिळनाडूला जाण्यासाठी खास विमानाने म्हैसूरला पोहोचलेल्या राहुल गांधींचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भेट म्हणून फुलांचा गुच्छ आणि म्हैसूर पॅलेसचे मॉडेल देऊन स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राहुल गांधींशी काही मिनिटे महत्त्वाची चर्चा केल्याचे सांगितले जाते.

नंतर, माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राहुल गांधी यांचे स्वागत केल्यानंतर ते कुदलूर येथील कार्यक्रमासाठी रवाना झाले आहेत. संध्याकाळी पुन्हा येथे येऊन ते दिल्लीला परत जाणार असून, त्यांना निरोप देण्यासाठी मी येणार आहे.

राहुल गांधींसोबत नेतृत्वबदल अथवा अंतर्गत राजकारणावर चर्चा झाली का, या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले, “आमच्या पक्षात नेतृत्वबदलाबाबत कोणतीही चर्चा नाही. कोणताही गोंधळही नाही. ही सर्व चर्चा केवळ माध्यमांनी निर्माण केलेली आहे.”

सत्तावाटप किंवा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमदार वक्तव्य करत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले की, “नेतृत्वबदलाबाबत बोलायचे असेल तर मी किंवा उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीच बोलायला हवे. आम्ही असे काही बोललो आहे का?”

डी. के. शिवकुमार यांनी दिलेले आश्वासन पूर्ण करण्याबाबत माध्यमांनी विचारले असता, मुख्यमंत्री म्हणाले, “अंतिम निर्णय हायकमांड घेईल आणि त्यानुसार आम्ही सर्वजण वागू. आमदारांना याबाबत माहिती नसते. हायकमांड काय म्हणते, त्यावरच निर्णय होईल. डी. के. शिवकुमार यांनी असे काही विधान केलेले नाही. माध्यमेच हे मुद्दे निर्माण करत आहेत,” असे म्हणत त्यांनी माध्यमांवरच ठपका ठेवला.

अखिल भारतीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी हा विषय स्थानिक पातळीवर सोडवावा, असे सांगितल्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “मी आणि खर्गे साहेब यांच्यात याबाबत चर्चा झाली आहे. मी त्यांच्या घरी गेलो होतो, ते आमच्या घरी नाश्त्यासाठी आले होते. हायकमांड जो निर्णय घेईल, त्यानुसारच पुढे जायचे, यावर आमचे एकमत आहे.”

मंत्रिमंडळ पुनर्रचनेसाठी दिल्लीला जाणार का, या प्रश्नावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्टपणे नकार दिला. “मी दिल्लीला जात नाही. उद्या विशेष मंत्रिमंडळ बैठक बोलावली असून, त्यात चर्चा केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

स्थानिक स्वराज्य संस्था, तालुका पंचायत, जिल्हा पंचायत तसेच बंगळुर महानगरपालिका निवडणुकांसाठी सरकार तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. राज्याचा अर्थसंकल्प बहुधा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होईल, असे सांगत, हावेरी जिल्ह्यात साधना मेळावा आयोजित करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले.

भाजप–धजद युतीचा निवडणुकांवर परिणाम होईल का, या प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “याचा काहीही परिणाम होणार नाही. दोन्ही पक्षांकडून एकच उमेदवार उभा राहील. भाजप असो वा धजद, दोन्ही एकच आहेत.” दोन्ही पक्षांची मते एकत्र आली तर काय, या प्रश्नावर त्यांनी ठामपणे सांगितले की, “तसे होणार नाही. काँग्रेसविरोधी किंवा काँग्रेससमर्थक अशीच मते असतात.”

About Belgaum Varta

Check Also

शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

Spread the love  क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *