Tuesday , March 3 2026
Breaking News

कर्नाटकातून ईव्हीएम हद्दपार; जीबीए, जिल्हा-तालुका पंचायत व ग्रामपंचायत निवडणुका मतपत्रिकेवरच

Spread the love

 

राज्य निवडणूक आयुक्त संग्रेश; जिल्हा, तालुका पंचायत निवडणुका मे-जून महिन्यात शक्य

बंगळूर : आगामी ग्रेटर बंगळुर प्राधिकरण (जीबीए), जिल्हा पंचायत, तालुका पंचायत तसेच ग्रामपंचायत निवडणुका मतपत्रिकेवरच घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेश यांनी दिली. जीबीए क्षेत्रासाठी प्रारूप मतदार यादी जाहीर केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आयुक्त संग्रेश म्हणाले, “आम्ही आतापर्यंत फक्त विधानसभा निवडणुकांसाठी ईव्हीएमचा वापर केला आहे. असे नाही की आम्ही मतपत्रिकेवर निवडणुका घेऊ शकत नाही. आगामी जीबीए निवडणुका तसेच जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुकाही मतपत्रिकेवरच होतील.”

ते पुढे म्हणाले की, जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका मे किंवा जून महिन्यात घेण्याचा आमचा विचार आहे. यासाठी सरकारकडून सीमांकनाचा अहवाल सादर होणे आवश्यक आहे. या संदर्भात ३० जानेवारी रोजी न्यायालयात एक याचिका सुनावणीसाठी आहे. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.

ग्रामपंचायत निवडणुकांबाबतही त्यांनी स्पष्ट केले की, ग्रामपंचायत निवडणुका देखील मतपत्रिकेवरच घेण्यात येतील. “मतदान पद्धतीबाबत अनेक नागरिकांकडून पत्रे आली असून, काहींनी मतपत्रिका तर काहींनी ईव्हीएमद्वारे मतदान करण्याची मागणी केली आहे. मात्र, आम्हाला या निवडणुकांसाठी मतपत्रिकेनेच मतदान करणे अधिक योग्य वाटते,” असे त्यांनी नमूद केले.

ग्रेटर बंगळूरची ८८.९१ लाख मतदारांची प्रारूप यादी जाहीर

ग्रेटर बंगळूर एरिया (जीबीए) अंतर्गत नव्याने स्थापन झालेल्या पाच शहर महानगरपालिकांच्या निवडणुका मतपत्रिकेद्वारेच घेतल्या जातील, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त जी. एस. संग्रेशी यांनी सोमवारी दिली. यासोबतच ८८.९१ लाख मतदारांचा समावेश असलेली प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीही जाहीर करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले की, जीबीए कायद्यानुसार मतपत्रिका किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे (ईव्हीएम) यापैकी कोणताही पर्याय वापरण्याची मुभा आहे. मात्र सध्या मतपत्रिकांवर कोणतीही कायदेशीर अथवा न्यायालयीन बंदी नसल्याने निवडणुका मतपत्रिकेद्वारेच घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आयोगाच्या माहितीनुसार, नागरी संस्थांच्या निवडणुका २५ मे २०२६ नंतर आणि ३० जून २०२६ पूर्वी पार पडतील. या निवडणुकांसाठी बंगळुर मध्य, बंगळुर उत्तर, बंगळुर दक्षिण, बंगळूर पूर्व आणि बंगळुर पश्चिम या पाच नव्या महानगरपालिकांतील एकूण ३६९ वॉर्डांचा समावेश करण्यात आला आहे.

ग्रेटर बंगळूर प्राधिकरणाचे विशेष आयुक्त आर. रामचंद्रन यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रारूप मतदार यादीत ४५,६९,१९३ पुरुष, ४३,२०,५८३ महिला आणि इतर श्रेणीतील १,६३५ मतदारांचा समावेश आहे.

मतदार यादीच्या पुनरावलोकन प्रक्रियेअंतर्गत, बूथ लेव्हल ऑफिसर (बीएलओ) २० जानेवारी ते ३ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. या कालावधीत मतदारांना दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. दाखल झालेल्या दावे व हरकतींचे निवारण ४ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी दरम्यान केले जाईल, तर अंतिम मतदार यादी १६ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

वॉर्डनिहाय पाहता, बंगळूर पश्चिम शहर महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक २३ मध्ये सर्वाधिक ४९,५३० मतदार आहेत, तर बंगळूर पूर्व शहर महानगरपालिकेतील वॉर्ड क्रमांक १६ मध्ये सर्वात कमी १०,९२६ मतदार नोंदले गेले आहेत. या ३६९ वॉर्डांसाठी एकूण ८,०४४ मतदान केंद्रे उभारण्यात येणार असल्याची माहितीही निवडणूक आयोगाने दिली आहे.

About Belgaum Varta

Check Also

शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

Spread the love  क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *