Friday , April 17 2026
Breaking News

संजीवीनीच्या क्रीडामहोत्सवात उमटला आनंदाचा नवा सूर

Spread the love

 

बेळगाव : खेळाचा आनंद, आपुलकीचा स्पर्श आणि आत्मविश्वासाची नवी उभारी या तिन्हींचे अनोखे मिश्रण अनुभवायला मिळाले ते संजीवीनी फाउंडेशनच्या वार्षिक क्रीडामहोत्सवात. काळजी केंद्रातील रुग्णांसाठी आयोजित केलेला हा क्रीडामहोत्सव केवळ स्पर्धा नव्हता, तर आनंद, पुनर्वसन आणि मानवी सन्मानाचा उत्सव ठरला.
खेळाच्या माध्यमातून उपचाराची संकल्पना
प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही संजीवीनी फाउंडेशनने आपल्या काळजी केंद्रातील रुग्णांसाठी हा उपक्रम राबविला. खेळ केवळ शारीरिक तंदुरुस्तीपुरता मर्यादित नसून मानसिक स्थैर्य, सामाजिक बांधिलकी आणि भावनिक स्वास्थ्यासाठीही उपयुक्त ठरतो, ही भूमिका ठेवून हा क्रीडामहोत्सव आखण्यात आला होता. ५० हून अधिक रुग्ण-स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.

मैदानावर आणि सभागृहातही

मैदानी स्पर्धांमध्ये थ्रो बॉल, पोत्यात पाय घालून उड्या मारणे, लिंबू-चमचा, १०० मीटर रिले शर्यत आणि सावकाश चालणे या खेळांचा समावेश होता. प्रत्येक स्पर्धेत स्पर्धकांचा जिद्द, चिकाटी आणि आनंद दिसून आला.
त्याचबरोबर इनडोअर स्पर्धांमध्ये कोलाज निर्मिती, मातीपासून वस्तू तयार करणे, केशरचना आणि संगीत खुर्ची या सर्जनशील स्पर्धाही रंगल्या. या माध्यमातून रुग्णांच्या कलागुणांना वाव मिळाला आणि त्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळाली.

प्रमुख पाहुणे पोलीस उपायुक्त नारायण बरमणी आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष व उद्योगपती रोहन जुवळी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. यावेळी रंगीबेरंगी फुगे आकाशात सोडून क्रीडामहोत्सवाची सुरुवात करण्यात आली.
मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन संजीवीनी फाउंडेशनचे चेअरमन मदन बामणे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय सावित्री माळी यांनी केला.

संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविकात संजीवीनीच्या कार्याचा गाभा उलगडून दाखवला. त्या म्हणाल्या,
काळजी केंद्रातील रुग्णांसाठी आम्ही वर्षभर विविध उपक्रम राबवितो. क्रीडा स्पर्धा हा त्यातील महत्त्वाचा भाग आहे. या माध्यमातून त्यांच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि भावनिक आरोग्यात सकारात्मक बदल घडतात. हा केवळ मनोरंजनाचा कार्यक्रम नाही, तर उपचार प्रक्रियेचाच एक भाग आहे. त्या पुढे म्हणाल्या की, भविष्यात संजीवीनी फाउंडेशन स्वतःच्या वास्तूमध्ये २०० रुग्णांची सेवा करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत आहे.

उपायुक्त नारायण बरमणी यांनी संजीवीनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करताना सांगितले, समाजासाठी अत्यंत विधायक आणि मानवी दृष्टिकोनातून महत्त्वाचे काम येथे सुरू आहे. अशा उपक्रमांमुळे रुग्णांना नवी ऊर्जा मिळते. संजीवीनीचे कार्य आदर्शवत आहे.

उद्योगपती रोहन जुवळी यांनी संस्थेच्या दूरदृष्टीचे कौतुक करताना नमूद केले, बेळगावमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि मनोरुग्णांसाठी इतक्या समर्पणाने काम करणारी संस्था आहे, याचा अभिमान वाटतो. भविष्यात ही सेवा केवळ २०० रुग्णांपुरती मर्यादित न ठेवता अधिक क्षमतेचे काळजी केंद्र उभारावे, कारण समाजाला अशा सेवांची मोठी गरज आहे.

अध्यक्षीय भाषणात चेअरमन मदन बामणे यांनी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले आणि स्वयंसेवक व कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, संजीवीनी फाउंडेशनचे प्रत्येक उपक्रम मानवी प्रतिष्ठा जपणारे आणि समाजाला दिशा देणारे आहेत.

सरिता नाईक, पद्मा औषेकर, पुष्पा बेंडवाड, ऋतुजा काटे, अर्चना शिरहट्टी, सुनिल चन्नदासर, संजीवनी पोतदार, अंकिता राजोरे, कावेरी लमानी, गुरुराज हडपद, जमुना कडोलकर, रोहित मंडळे, बसम्मा बेनकट्टी, विजयालक्ष्मी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
वैष्णवी नेवगिरी यांनी स्पर्धा प्रमुख म्हणून काम पाहिले
कार्यक्रमाला संचालिका रेखा बामणे तसेच सल्लागार सदस्य डॉ. सुरेखा पोटे, डॉ. नवीना शेट्टीगार, संजय पाटील आणि विद्या सरनोबत उपस्थित होते.

सूत्रसंचालन अक्षता अक्कोळे यांनी केले तर आभार कावेरी नेगी यांनी मानले.

About Belgaum Varta

Check Also

महिलांच्या राजकीय सक्षमीकरणाबाबत जागरूकता तसेच 33% महिलांना आरक्षण हेच भाजपचे ध्येय : माजी खासदार मंगला अंगडी

Spread the love  बेळगाव : नारी शक्ती फोरमच्या वतीने “नारी शक्ती वंदन अधिनियम” निमित्त महिलांसाठी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *