संयुक्त अधिवेशनात अभूतपूर्व गदारोळ
बंगळूर : राज्य विधिमंडळाच्या संयुक्त अधिवेशनात आज अभूतपूर्व राजकीय नाट्य पाहायला मिळाले. राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी सरकारने तयार केलेले भाषण पूर्णपणे न वाचता, स्वतः तयार केलेल्या काहीच ओळी वाचून सभागृहातून बाहेर पडल्याने मोठा गदारोळ झाला. यामुळे सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधक भाजप-धजद यांच्यात जोरदार घोषणाबाजी झाली आणि सभागृह रणांगणात रूपांतरित झाले.
राज्यपालांनी सरकारच्या भाषणातील काही मुद्द्यांवर आक्षेप घेतला असून आपण ते वाचणार नाही, असे मंगळवारीच सरकारला कळवले होते. बुधवारी सकाळी मात्र त्यांनी संयुक्त अधिवेशनाला उपस्थित राहून भाषणास सुरुवात केली. “विधानपरिषद सभापती, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि सन्माननीय सदस्यहो” असे संबोधन करून राज्य सरकार सामाजिक व आर्थिक विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यानंतर “जय हिंद, जय कर्नाटक” एवढेच शब्द उच्चारून सरकारचे संपूर्ण भाषण न वाचताच ते सभागृहातून बाहेर पडले.
राज्यपालांनी भाषण पूर्ण न केल्याने सत्ताधारी काँग्रेसच्या सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. “भाषण वाचा, भाषण वाचा” अशा घोषणा देत सदस्यांनी सभागृहात निषेध नोंदवला. काही सदस्यांनी भाषणाच्या प्रती हातात घेऊन राज्यपालांनी घटनात्मक जबाबदारी पार पाडावी, अशी मागणी केली.
याला प्रत्युत्तर म्हणून भाजप आणि धजदच्या सदस्यांनी राज्यपालांच्या भूमिकेचे समर्थन करत घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. या गदारोळातच राज्यपाल अध्यक्षांच्या आसनावरून खाली उतरून सभागृहातून बाहेर पडले.
राज्यपाल बाहेर जात असताना काँग्रेसचे काही आमदार आणि विधानपरिषदेचे सदस्य त्यांच्या मागे गेले. विधानपरिषद सदस्य एस. रवी आणि आमदार बालकृष्ण यांनी थेट राज्यपालांना अडवून भाषण वाचण्याची मागणी केली. यावेळी मार्शल्सनी हस्तक्षेप करून संबंधित सदस्यांना बाजूला सारले आणि राज्यपालांना कडेकोट सुरक्षेत बाहेर नेले.
राज्यपाल सभागृहातून बाहेर पडून विधानसभा भवनाच्या पूर्वेकडील दरवाज्याकडे जात असताना देखील काही काँग्रेस सदस्य घोषणाबाजी करत होते. अखेर राज्यपाल आपल्या वाहनातून लोकभवनाकडे रवाना झाले. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विधानपरिषद सभापती बसवराज होरट्टी आणि विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांनी त्यांना निरोप दिला.
राज्यपालांच्या निर्गमानानंतरही सभागृहात काँग्रेस सदस्यांचा निषेध सुरूच होता.
तीन वाक्यांत संपलेले भाषण
सकाळी अकरा वाजता संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना राज्यपालांनी केवळ तीनच मुद्दे मांडले. सरकार सामाजिक-आर्थिक विकासासाठी कटिबद्ध आहे, असे सांगून त्यांनी भाषण आवरते घेतले.
सरकार-राज्यपाल संघर्ष टोकाला
व्हीबी जी राम जी कायद्यावरील चर्चेसाठी बोलावण्यात आलेल्या या विशेष अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल आणि सरकारमध्ये आधीच तणाव निर्माण झाला होता. या कायद्याला विरोध करणारे मुद्दे भाषणातून वगळावेत, अन्यथा आपण भाषण करणार नाही, असे पत्र राज्यपालांनी मुख्य सचिवांना पाठवले होते.
यानंतर कायदा व संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी मंगळवारी रात्री राज्यपालांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यपाल आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट शब्दांत सरकारचे भाषण बदलणार नसल्याचे सांगत, राज्यपालांनी अधिवेशनाला संबोधित करणे ही घटनात्मक जबाबदारी असल्याचे नमूद केले.
या पार्श्वभूमीवर आज राज्यपालांनी भाषण अपूर्ण ठेवून सभागृहातून काढता पाय घेतल्याने सरकार आणि राजभवनातील संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta