कॅश भरण्याची जबाबदारी असलेले कर्मचारीच फरार
बंगळूर : एटीएम यंत्रांमध्ये भरण्यासाठी असलेले १.३७ कोटी रुपयांहून अधिक रोख रक्कम चोरून कॅश मॅनेजमेंट कंपनीचेच कर्मचारी फरार झाल्याची धक्कादायक घटना कोरमंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. हिटाची पेमेंट सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील काही कर्मचाऱ्यांवर हा प्रकार केल्याचा आरोप आहे.
कोरमंगलमधील अॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्याचे निर्देश कंपनी अधिकारी मिथुन यांनी १९ जानेवारी रोजी दिले होते. त्यानुसार एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कंपनीने दोन वेगवेगळ्या पथकांना रोख रक्कम वितरित केली होती. प्रविण, धनशेखर, रामक्का, हरीश कुमार, प्रविण कुमार आणि वरुण या कर्मचाऱ्यांकडे एटीएममध्ये पैसे भरण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी एटीएममध्ये पैसे न भरता संपूर्ण रक्कम घेऊन पलायन केल्याचे निष्पन्न झाले आहे. एका पथकाने सुमारे ५७ लाख रुपये घेऊन फरार झाल्याचे तर दुसऱ्या पथकाने सुमारे ८० लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याचे तपासात समोर आले आहे.
एटीएममध्ये पैसे जमा न झाल्याचे लक्षात आल्यानंतर कंपनी अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता हा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला. याप्रकरणी हिटाची पेमेंट सर्व्हिस कंपनीचे अधिकारी मिथुन यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोरमंगल पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तसेच मोबाईल कॉल रेकॉर्ड्सची तपासणी करत असून आरोपींचा शोध सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
या घटनेमुळे खासगी कॅश मॅनेजमेंट कंपन्यांच्या सुरक्षा व्यवस्था आणि देखरेख प्रणालीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta