
धरणे, घोषणांच्या गोंधळातच ‘व्हीबी-जी राम जी’ कायद्यावर चर्चा
बंगळूर : अबकारी मंत्री आर. बी. तिम्मापूर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून बुधवारी विधानसभेत तीव्र गदारोळ झाला. भाजपा आणि धजद सदस्यांनी अबकारी विभागातील कथित भ्रष्टाचाराची जबाबदारी स्वीकारून मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, या मागणीसाठी सभागृहात धरणे आंदोलन सुरू ठेवले. या गोंधळामुळे एकदा सभागृह तहकूब करावे लागले; मात्र त्यानंतरही धरणे आणि घोषणांच्या गदारोळातच ‘व्हीबी-जी राम जी’ कायद्यावरील चर्चा पार पडली.
सभागृह सुरू होताच भाजपा व धजद सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येत जोरदार घोषणाबाजी करत फलक प्रदर्शित केले. सभापती यू. टी. खादर यांनी वारंवार धरणे मागे घेऊन चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले; मात्र विरोधकांनी त्याकडे दुर्लक्ष करत आंदोलन कायम ठेवले. त्यामुळे सभागृहातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले.
या गदारोळात विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी बोलताना, “अबकारी विभागात सुमारे ६ हजार कोटी रुपयांचा मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हे केवळ विभागापुरते मर्यादित नसून सरकारच्या सर्वोच्च स्तरापर्यंत पोहोचलेले प्रकरण आहे,” असा गंभीर आरोप केला. “आरोपांची चौकशी होईपर्यंत मंत्री तिम्मापूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा. दोषमुक्त ठरल्यास त्यांना पुन्हा मंत्रिपद देण्यात आमचा आक्षेप नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी के. जे. जॉर्ज आणि के. एस. ईश्वरप्पा यांनी आरोपांनंतर राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाऊन दोषमुक्त झाल्यानंतर पुन्हा मंत्रीपद स्वीकारले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. “केंद्रातील काँग्रेससाठी कर्नाटक एटीएम नव्हे तर आरबीआय झाले आहे,” अशी टीका करत त्यांनी मुख्यमंत्र्यांवरही निशाणा साधला. “नैतिकता शिकवणाऱ्यांनी प्रथम मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा आणि दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,” अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, सभापतींनी “तुम्ही धरणे सुरू ठेवा, मी रात्रीपर्यंत सभागृह चालवीन,” असे सांगत व्हीबी-जी राम जी कायद्यावरील चर्चेला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. काँग्रेसचे कोनरेड्डी आणि नंतर शरथ बच्चेगौडा यांनी या कायद्याला संविधानविरोधी ठरवत मनरेगा पूर्ववत लागू करण्याची मागणी केली.
गोंधळ वाढल्याने उपसभापती रुद्रप्पा लमाणी यांनी दहा मिनिटांसाठी सभागृह तहकूब केले. पुन्हा सभा सुरू झाल्यानंतरही भाजपा सदस्यांचे धरणे व घोषणाबाजी सुरूच होती. काँग्रेसचे शिवलिंगेगौडा, रंगनाथ आणि नारायणस्वामी यांनीही चर्चेत भाग घेत व्हीबी-जी राम जी कायदा रद्द करून मनरेगा पुनर्स्थापित करण्याची मागणी लावून धरली.
शिवलिंगेगौड यांची भाजपवर जहरी टीका
यावेळी काँग्रेस आमदार के. एम. शिवलिंगेगौड यांनी भाजप नेत्यांविरोधात एकवचनी शब्दांत तीव्र आणि आक्रमक टीका केल्याने सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला.
विधानसभेत संताप व्यक्त करत शिवलिंगेगौड म्हणाले, “तुम्हाला काही लाज-शरम आहे का? हे सभागृह आहे की नाचायला आला आहात? आम्हीही धरणे केली आहेत, पण अशा पद्धतीने कधीही नाही. तुमच्यासारखे वाईट लोक मी आयुष्यात पाहिले नाहीत,” अशा शब्दांत त्यांनी भाजप सदस्यांवर जोरदार हल्ला चढवला.
यावेळी त्यांनी थेट एकवचनी उल्लेख करत ‘आरएसएस’चा संदर्भ देत अत्यंत आक्षेपार्ह शब्दप्रयोग केला. भाजप आमदार शरणू सलगर यांच्यासह इतर सदस्यांकडे रोखून ते म्हणाले, “माझ्यावर वैयक्तिक हल्ले केले जात आहेत. अशी वाईट आणि खालच्या पातळीची वर्तणूक मी कधी पाहिली नाही. या लोकांना तात्काळ सभागृहाबाहेर काढा.”
शिवलिंगेगौड यांनी राज्यपालांवरही टीका करत म्हटले की, “राज्यपालांनी कायद्याच्या अंमलबजावणीला अडथळा आणला आहे. त्यांनी परवानगी दिली असती, तर परिस्थिती वेगळी असती,” असे सूचक विधान त्यांनी केले.
विधानसभेत गदारोळ; कामकाज तहकूब
या संपूर्ण प्रकारामुळे विधानसभेत तीव्र गोंधळ आणि कोलाहल निर्माण झाला. मंत्री तिम्मापूर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून विरोधकांनी जोरदार आंदोलन केले, परिणामी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी तहकूब करावे लागले.
भाजपकडून माफीची मागणी
शिवलिंगेगौड यांनी सभागृहात एकवचनी आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केल्याचा आरोप करत भाजप सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
“लोकप्रतिनिधी म्हणून अशी भाषा अजिबात स्वीकारार्ह नाही. शिवलिंगेगौड यांनी तात्काळ सभागृहाची माफी मागावी,” अशी जोरदार मागणी भाजपकडून करण्यात आली.
दरम्यान, तिम्मापूर यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर भाजप व धजद सदस्यांनी काल विधानसभेत रात्रभर धरणे आंदोलन केले होते. आज सकाळीही सभागृह सुरू होताच त्यांनी पुन्हा सभापतींच्या आसनासमोर येत घोषणाबाजी सुरू केली. परिणामी, संपूर्ण दिवसाचे कामकाज गदारोळाच्या वातावरणातच पार पडले.

Belgaum Varta Belgaum Varta