
बंगळूर : इंधन दरवाढ आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे हैराण झालेल्या राज्यातील जनतेला राज्य सरकारने पुन्हा मोठा धक्का दिला आहे. कर्नाटक विद्युत प्राधिकरणाने (केईआरसी) वीज वापरावरील दर प्रति युनिट ३५ पैशांनी वाढवला आहे, एक एप्रिलपासून सुधारित दर लागू होतील.
गेल्या वर्षी त्यात ३० पैशांनी वाढ करण्यात आली होती. यावेळी त्यात ३५ पैशांची वाढ झाली आहे. केईआरसीचे हंगामी अध्यक्ष मंजुनाथ यांनी बेस्कॉम, चेस्कॉम, मेस्कॉम आणि जेस्कॉम, हेस्कॉम विभागातील विजेच्या दरांची माहिती दिली, ज्यामध्ये प्रति युनिट ३५ पैशांनी वाढ करण्यात आली आहे.
एस्कॉमने प्रति युनिट एक रुपये ८५ पैसे दरवाढीची विनंती केली होती. मात्र उत्पन्न भरून काढण्यासाठी दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आम्ही इंधन शुल्कात केवळ पाच पैशांनी वाढ केली असल्याचे, मंजुनाथ म्हणाले.
यावेळी दरात ४.३३ टक्के दरवाढ करण्यात आली आहे. सरासरी इंधन दरासह प्रति युनिट ३५ पैशांनी वाढ झाली आहे. तसेच कुटीर आणि लघु उद्योगांना वर्षभरासाठी मासिक इंधन वापरावर सवलत दिली जाईल, असेही ते म्हणाले.
इंधन वापरावर प्रति युनिट ५० पैसे सवलत देण्यात येते. हंगामी उद्योगाना सध्याचा एक रुपये सवलतीचा दर कायम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात २१५९.४८ कोटी रुपयांची महसुली तूट भरून काढण्यासाठी दरवाढ अपरिहार्य आहे. २०२०-२१ वर्षातील तूट १७००.४९ कोटी रुपये त्यात समाविष्ट आहे, असे ते म्हणाले.
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगचे दर वाढलेले नाहीत, असे मंजुनाथ यांनी सांगितले.
Belgaum Varta Belgaum Varta