
१४ गुन्हे दाखल, १३ जणाना अटक; राज्यात ४२ हजार ‘म्युल अकाउंट्स’चा पर्दाफाश
बंगळूर : राज्यात वाढत चाललेल्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सीआयडीच्या सायबर गुन्हे विभागाने मोठी कारवाई सुरू केली असून, निष्पाप नागरिकांच्या बँक खात्यांचा गैरवापर करून सायबर गुन्हेगारांना मदत करणाऱ्यांविरुद्ध १४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत आतापर्यंत १३ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सायबर गुन्हेगारांकडून ‘म्युल अकाउंट्स’ (खच्चर खाते) वापरून फसवणुकीचे पैसे हस्तांतरित करण्याचे प्रकार झपाट्याने वाढले आहेत. याला आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून, त्याअंतर्गत गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सीईएन (सायबर, ईकॉनॉमिक अँड नोर्कोटिक्स) पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
४२ हजार म्युल अकाउंट्सची नोंद
प्राथमिक तपासात राज्यभरात तब्बल ४२ हजार म्युल अकाउंट्स अस्तित्वात असल्याचे समोर आले आहे. पहिल्या टप्प्यात, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बंगळुरसह राज्यातील २९ सीईएन पोलीस ठाण्यांच्या अधिकाऱ्यांना १५८ म्युल अकाउंट्सशी संबंधित खातेधारकांच्या पत्त्याची व इतर तपशीलांची माहिती शुक्रवारी संध्याकाळपर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
खऱ्या खातेदारांची चौकशी सुरू
वरिष्ठांच्या आदेशानुसार बंगळुर, चित्रदुर्ग, गदग, कोप्पळ, धारवाड यांसह विविध जिल्ह्यांमध्ये खऱ्या बँक खातेदारांची ओळख पटवून त्यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १५८ संशयित खातेदारांना आपले व्यवहार व खातेविषयक तपशील देण्यास सांगण्यात आले आहे.
सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, निष्पाप नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करून त्यामार्फत फसवणूक करणाऱ्यांना मदत करणाऱ्यांवर येत्या काळात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला आहे.
खच्चर खाते म्हणजे काय?
सायबर गुन्हेगार विविध मार्गांनी बँक खात्यांची माहिती मिळवतात किंवा आमिष दाखवून नागरिकांची खाती वापरात घेतात. अनेक वेळा खातेधारकांच्या नकळत त्यांच्या खात्यात फसवणुकीचे पैसे ट्रान्सफर केले जातात. नंतर ते पैसे पुढे इतर खात्यांत वळवले जातात. जेव्हा या व्यवहारांवरून गुन्हा दाखल होतो, तेव्हाच खऱ्या खातेधारकांना त्यांच्या खात्याचा गैरवापर झाल्याचे समजते.
अशा खच्चर खात्यांचा वापर करून राज्यातील अनेक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणालाही आपली बँक माहिती, एटीएम कार्ड, ओटीपी किंवा खाते वापरण्यास देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta