
चार भ्रष्ट अधिकाऱ्यांकडून कोट्यवधींची अवैध मालमत्ता उघड
बंगळूर : बंगळुर, शिमोगा, धारवाड आणि दावणगेरे येथे एकाचवेळी छापेमारी करत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी चार भ्रष्ट अधिकाऱ्यांना जाळ्यात ओढले असून त्यांच्या ताब्यातून कोट्यवधी रुपयांच्या अवैध मालमत्तेचा पर्दाफाश केला आहे.
लोकायुक्तांच्या कारवाईत अडकलेल्यांमध्ये बंगळुर ग्रामीण येथील कर्नाटक रेसिडेन्शियल एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स सोसायटीचे अधीक्षक अभियंता एच. एम. जनार्दन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (राष्ट्रीय महामार्ग) मुख्य अभियंता पुरुषोत्तम दास हेगडे, दावणगेरे येथील बीईएसकॉमचे सहाय्यक कार्यकारी अभियंता अर्जुन आर. एच. आणि धारवाड येथील भू-अभिलेख विभागाचे सर्वेयर सोमलिंगप्पा यांचा समावेश आहे.
११ ठिकाणी छापे
मुख्य अभियंता पुरुषोत्तम दास हेगडे यांच्या कार्यालयासह निवासस्थानांवर एकूण ११ ठिकाणी लोकायुक्तांनी छापे टाकले. तसेच एच. एम. जनार्दन यांच्या कार्यालय आणि घरावर सकाळपासूनच तपास मोहीम राबवण्यात आली. म्हैसूरमध्ये पाच आणि बंगळुरमध्ये सहा ठिकाणी छापे घालून महत्त्वाच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
बीईएसकॉम अभियंत्याविरोधात कारवाई
दावणगेरे येथील बीईएसकॉमच्या सिव्हिल विभागात कार्यरत असलेले सहाय्यक कार्यकारी अभियंता अर्जुन आर. एच. यांच्यावर उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याचा आरोप होता. या पार्श्वभूमीवर लोकायुक्त एसपी एम. एस. कौलापूर यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली.
अर्जुन यांच्या दावणगेरे शहरातील निट्टुवळ्ळी येथील निवासस्थान, कार्यालय तसेच शिमोगा येथील घरावर एकाचवेळी छापे टाकण्यात आले. शिमोग्यातील घरातून मालमत्तेची कागदपत्रे, सोने-चांदी आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. शिमोग्यातील विजयनगर आणि गोपालगौडा परिसरातील त्यांच्या निवासस्थानांचीही तपासणी करण्यात आली.
याशिवाय सागर तालुक्यातील आनंदपूरजवळ तळले गावात अर्जुन यांच्या मालकीची २.५ एकर आणि ४.५ एकर क्षेत्रफळाची दोन मोठी फार्महाऊसेसही तपासण्यात आली. लोकायुक्त डीवायएसपी चंद्रशेखर तसेच निरीक्षक प्रभू सोरेन आणि गुरुराज मायलारी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई सुरू असून कागदपत्रांची छाननी करण्यात येत आहे.
धारवाडमध्ये सर्वेयरच्या घरांवर छापे
धारवाड येथे सर्वे अधिकारी सोमलिंगप्पा सिद्दनगौडर यांच्या मुरगोड येथील निवासस्थान, भारतीनगर येथील घर तसेच एडीएलआर कार्यालयात लोकायुक्त पोलिसांनी तपास केला. लोकायुक्त एसपी सिद्दलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली असून त्यांच्या मालमत्तेची सविस्तर माहिती गोळा करण्यात येत आहे.
लोकायुक्तांच्या या मोठ्या कारवाईमुळे राज्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पुढील तपास सुरू आहे.
लोकायुक्तांच्या जाळ्यात अडकलेले अधिकारी
एच. एम. जनार्दन – अधीक्षक अभियंता, केआरईआयएस, बंगळुर ग्रामीण
पुरुषोत्तम दास हेगडे – मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बंगळुर
अर्जुन आर. एच. – सहाय्यक कार्यकारी अभियंता, बीईएसकॉम, दावणगेरे
सोमलिंगप्पा – सर्वेयर, धारवाड
Belgaum Varta Belgaum Varta