
जॉली राईडचा दुर्दैवी अंत
बंगळूर : शहराच्या बाहेरील भागातील होस्कोटे तालुक्यातील एम. सत्त्यवर गावाजवळ आज पहाटे भीषण साखळी अपघात घडून सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अतिवेगात असलेल्या मोटारने नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.
पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास महिंद्रा एक्सयूव्ही ७०० मोटारमध्ये शहरातील एका महाविद्यालयातील सहा पीयूसी विद्यार्थी ‘लाँग ड्राइव्ह’साठी निघाले होते. नवीन महामार्गावर वेगात येत असताना त्यांनी प्रथम गगन (वय २६) यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटून मोटारने पुढे जात डिव्हायडर ओलांडला आणि समोरून येणाऱ्या कॅन्टरला समोरासमोर धडक दिली.
धडकेची तीव्रता इतकी भीषण होती की मोटारमधील सर्व एअरबॅग्ज उघडल्या; मात्र अतिवेग आणि धडकेच्या प्रचंड जोरामुळे प्रवाशांचे प्राण वाचवता आले नाहीत. अपघातानंतर कॅन्टर उलटला असून त्याची मागील दोन चाके वेगळी झाली. त्याचवेळी रस्त्यावरून येणाऱ्या आणखी एका ब्रेझा मोटारचीही कॅन्टरच्या चाकांना धडक बसली. त्यामुळे संपूर्ण महामार्ग काही काळ रणांगणासारखा दिसत होता.
या अपघातात काम आटोपून घरी परतत असलेला गगन (वय २६) यांचाही मृत्यू झाला. तो सॅफल कंपनीत कार्यरत होता आणि आपल्या दृष्टिहीन आईचा एकमेव आधारस्तंभ होता.
मोटारमधील मृतांमध्ये अश्विन नायर (वय १७) हा यलहंका येथील आर. व्ही. पीयू कॉलेजचा विद्यार्थी होता. उर्वरित मृत विद्यार्थ्यांमध्ये अरहान, अयान अली, भरत, एथन जॉर्ज आि फरहान शी त्यांची ओळख पटली आहे. अश्विन नायर हा मित्रांसोबत घरच्यांना न सांगता बाहेर पडला होता. मुलगा घरी झोपला आहे, असे समजत असताना पोलिसांकडून फोन आल्यानंतर आईला दुर्घटनेची माहिती मिळाली आणि कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला.
घटनास्थळी केंद्रीय विभागाचे आयजीपी लाबुराम आणि एसपी चंद्रकांत यांनी भेट देऊन पाहणी केली. अपघाताचे मुख्य कारण अतिवेग असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
सर्व मृतदेह होसकोटे सरकारी रुग्णालयात ठेवण्यात आले असून पहाटेच आपल्या लेकरांना गमावलेल्या कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.
मृत विद्यार्थी आणि दुचाकीस्वारांची माहिती अशी
अश्विन नायर (वय १७) – आरव्ही पीयू कॉलेजचा विद्यार्थी, कोथनूरचा रहिवासी.
अरहान शरीफ – सीएमआर स्कूलचा विद्यार्थी, एचव्हीआर लेआउटचा रहिवासी
अयान अली (वय १७) – सीएमआर स्कूलचा विद्यार्थी
भरत (वय १८) – सीएमआर कॉलेजचा विद्यार्थी, फ्रेझर टाउनचा रहिवासी.
एथन जॉर्ज (वय १७) – आरव्ही फर्स्ट पीयू कॉलेजचा विद्यार्थी, हुलिमावूचा रहिवासी.
फरहान (वय १७) – आणखी एक तरुण जो मरण पावला.
गगन (वय २६) – मृत बाईकस्वार, यशस्वी संस्थेत काम करणारा.
Belgaum Varta Belgaum Varta