Tuesday , March 3 2026
Breaking News

जिंदालजवळ बस आणि कार यांच्यात भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Spread the love

 

भरधाव मोटार डिव्हायडर ओलांडून केएसआरटीसी बसला धडक

बंगळूर : शहराजवळील मादनायकनहळ्ळी परिसरातील जिंदालजवळ मध्यरात्री भीषण अपघात होऊन पाच जणांचा मृत्यू झाला. भरधाव वेगाने येणारी मोटार रस्त्यावरील डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या केएसआरटीसी बसला धडकली. या अपघातात मोटारमधील पाच युवकांचा मृत्यू झाला असून त्यात विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
अपघात इतका भीषण होता की चार जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एका जखमीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. धडकेच्या जोरदार आघातामुळे बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. बसच्या समोरील काचा फुटल्या असून पुढील आसनांवरील काही प्रवाशांना किरकोळ दुखापती झाल्या. सुदैवाने बसमधील उर्वरित ४२ प्रवासी थोडक्यात बचावले. बसचालक आणि वाहक यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे.
मृतांची नावे दुर्गा प्रसाद (वय २०), केशव ( वय १९), ललित (वय २२), हर्षित (वय २०) आणि ललित (वय २२) अशी आहेत. हे सर्वजण इंडिका मोटारमधून तुमकूरहून बंगळुरकडे येत होते. जिंदालजवळ मोटारचा ताबा सुटून ती डिव्हायडर ओलांडत समोरून येणाऱ्या केएसआरटीसी बसला धडकली आणि हा भीषण अपघात घडला. धडकेनंतर मोटार पूर्णपणे चेंदामेंदा झाली.
मृत हर्षित हा राजनकुंटे येथील साई विद्या महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा पदवी विद्यार्थी होता. तो रात्री साडेआठपर्यंत घरीच होता. मित्राला भेटून येतो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. मात्र मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
अपघातानंतर सर्व मृतदेह नेलमंगल येथील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयाबाहेर हर्षितच्या आईचा आक्रोश हृदयद्रावक होता. मुलाचा मृतदेह मिठीत घेऊन ती रडत होती, हे दृश्य उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारे होते.
घटनेची माहिती मिळताच मादनायकनहळ्ळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, गेल्या शुक्रवारीच बंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील होसकोटे तालुक्यात एम. सत्यवर गावाजवळ भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला होता. होसकोटे-दाबसपेट राष्ट्रीय महामार्गावर कॅंटर, दुचाकी आणि एक्सयूव्ही कार यांच्यात झालेल्या साखळी धडकेत मोटारमधील सहा जण आणि दुचाकीस्वार जागीच ठार झाले होते. त्या घटनेची शोकांतिका ताजी असतानाच आणखी एका अपघाताने परिसर हादरला आहे.

आई, मंदिरात जातोय…… ठरला शेवटचा संवाद

या अपघातातील एका मृत तरुणाच्या आईने माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘माझा मुलगा सीसीटीव्ही ऑपरेटर म्हणून काम करत होता. तो मंदिरात जात असल्याचे सांगून घरून निघाला होता आणि उशीर होईल असेही म्हणाला होता. ते सर्व मित्र होते, पण ती कार कोणाची होती हे मला माहित नाही,’ असे सांगताना त्यांना अश्रू अनावर झाले होते.

About Belgaum Varta

Check Also

शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

Spread the love  क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *