Tuesday , March 3 2026
Breaking News

सिद्धरामय्या हेच राज्यातील जनतेला नेतृत्व निर्णयांबाबत संदेश देतील

Spread the love

 

शिवकुमार यांचे विधान; नेतृत्वाचा निर्णय योग्य वेळी

बंगळूर : नेतृत्वाच्या मुद्द्यावर यापूर्वी सांगितल्याप्रमाणे मी, मुख्यमंत्री सिध्दरामय्या आणि पक्षाच्या हायकमांडने एकत्रितपणे निर्णय घेतला आहे. तो निर्णय काय आहे, हे योग्य वेळी जाहीर केले जाईल. हा कोणताही गुप्त व्यवहार नाही. वेळ आल्यावर मुख्यमंत्री स्वतः राज्यातील जनतेला याबाबत संदेश देतील, असे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.
बळ्ळारी रोडवरील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाजवळ पत्रकारांशी बोलताना त्यांनी अधिकार वाटपाबाबत मंत्री एच. सी. महादेवप्पा यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. “नेत्यांच्या विधानांबाबत मुख्यमंत्री आणि हायकमांड योग्य ती कारवाई करतील. मला महादेवप्पा किंवा इतर कुणालाही उत्तर द्यायचे नाही. महादेवप्पा वरिष्ठ नेते आहेत आणि आता तेही आमच्या हायकमांडचा भाग आहेत. त्यांच्या विषयी मी काही बोलणार नाही. याबाबत पक्षच निर्णय घेईल,” असे त्यांनी सांगितले.
परदेश दौऱ्याची माहिती नाही
काही आमदारांच्या परदेश दौऱ्याबाबत विचारले असता, “मला अशा कोणत्याही दौऱ्याची माहिती नाही. याबाबत मला माध्यमांतूनच समजले. हा त्यांचा वैयक्तिक दौरा आहे की कुणी त्यांना पाठवत आहे, हे मला ठाऊक नाही. पक्षाध्यक्ष म्हणून मी यात हस्तक्षेप करणार नाही,” असे शिवकुमार म्हणाले.

काँग्रेस भवनांसाठी जागा; भाजपवर आरोप
काँग्रेस भवनांसाठी सरकारी जागा वापरली जात असल्याच्या भाजपच्या आरोपांवर त्यांनी प्रत्युत्तर दिले. “होय, आम्ही काँग्रेस भवनांसाठी सरकारी जागा वापरत आहोत. महात्मा गांधी यांच्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शताब्दी वर्षानिमित्त १०० काँग्रेस भवनांच्या उभारणीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ५ ते १० हजार चौरस फूट जागा मंजूर केली जात आहे,” असे त्यांनी सांगितले.
भाजपच्या कार्यकाळात बंगळुरमध्ये विविध ट्रस्टच्या नावाखाली १०० हून अधिक ठिकाणी जागा मंजूर करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. चाणक्य विद्यापीठाला देण्यात आलेल्या जमिनीची बाजारभावाने किंमत प्रति एकर १० कोटी रुपये असताना, ती केवळ ५० लाख रुपये दराने १०० एकर जागा मंजूर करण्यात आली आणि सीएसआर निधीतून कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले, असा आरोपही त्यांनी केला.
तसेच, “भाजपने जागा दिल्याशिवाय आरएसएसचे कार्यालय कसे उभे राहिले? सदाशिवनगरमधील आमच्या घराशेजारील उद्यान वेलनेस सेंटरच्या योगा कार्यालयासाठी देण्यात आले आणि तेथे इमारत उभी करण्यात आली. अशी शेकडो उदाहरणे देता येतील. आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. आम्ही आमच्या पक्षाचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो पूर्ण करू. सर्व नियम व निकषांच्या आधारेच जागा मंजूर केली जात आहे. याबाबत कोणी न्यायालयात गेले तर आम्ही त्याला सामोरे जाऊ,” असे डी. के. शिवकुमार यांनी स्पष्ट केले.

About Belgaum Varta

Check Also

शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

Spread the love  क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *