
बंगळूर : बागलकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने जमावबंदी लागू केली असून पोलिसांनी ८ जणांना अटक केली आहे.
मराठा समाजाच्या वतीने सायंकाळी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. किल्ला परिसरातील अंबाभवानी मंदिरातून मिरवणुकीची सुरुवात झाली. त्यानंतर बसवेश्वर वर्तुळ, वल्लभभाई चौक मार्गे पंका मशिदीसमोरून मिरवणूक किल्ला परिसरात पोहोचणार होती. याच दरम्यान काही समाजकंटकांनी अचानक दगडफेक केली.
या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला. दोषींना तात्काळ अटक करावी, अशी मागणी करत काही हिंदू संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध आंदोलन केले. परिस्थिती निवळवण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. दगडफेकीत जिल्हा पोलिस अधीक्षक सिध्दार्थ गोयल यांनाही किरकोळ दुखापत झाली.
दरम्यान, दगडफेकीदरम्यान भाजी मार्केटमधील तीन हातगाड्यांना आग लावण्याची घटना घडली. घटनास्थळी उपस्थित पोलिसांनी तातडीने आग विझवून मोठा अनर्थ टाळला. शहरातील संवेदनशील भागांत कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून परिस्थितीवर प्रशासनाचे बारकाईने लक्ष आहे.
या घटनेचा निषेध करत प्रमोद मुतालिक यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. शिवाजी जयंतीसारख्या उत्सवात दगडफेक करणे हे देशद्रोही कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच या प्रकरणाला राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.
पाच दिवसांसाठी जमावबंदी
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त उद्भवलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बागलकोट शहर, नवनगर आणि विद्यागिरी परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता–२०२३ च्या कलम १६३ अंतर्गत जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
सहाय्यक आयुक्त तथा उपविभागीय दंडाधिकारी संतोष बी. जगलासर यांनी हा आदेश जारी केला आहे. १९ फेब्रुवारी मध्यरात्रीपासून २४ फेब्रुवारी मध्यरात्रीपर्यंत ही जमावबंदी लागू राहणार आहे. या कालावधीत चार किंवा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगणे, परवानगीशिवाय सभा, मोर्चे, आंदोलन आयोजित करणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे.
जमावबंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश पोलिस उपअधीक्षकांना देण्यात आले असून आवश्यक तेवढा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
८ जण अटकेत
दगडफेक प्रकरणात मुख्य आरोपी तंजीर याच्यासह एकूण ८ जणांना अटक करण्यात आली आहे. तंजीर याने प्रत्यक्ष दगडफेक केल्याचा आरोप असून इतरांना पोलिसांच्या कर्तव्यात अडथळा आणल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती एसपी सिद्धार्थ गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या घटनेत दोन पोलिस कॉन्स्टेबलांसह एकूण तिघे जखमी झाले आहेत. घटनेनंतर मिरवणूक शांततेत पूर्ण झाली. “मी स्वतः आणि माझ्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. घटनेस जबाबदार असलेल्या सर्वांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल,” असे एसपी गोयल यांनी स्पष्ट केले.
Belgaum Varta Belgaum Varta