Tuesday , March 3 2026
Breaking News

शिमोग्यात १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

Spread the love

 

क्रिकेट सामन्यातील वादातून घटना, सात अल्पवयीन ताब्यात

बंगळूर : शिमोगा येथे सुलेबैलू सरकारी शाळेबाहेर १६ वर्षीय विद्यार्थ्याची हत्या झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली. घटनेनंतर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

ऊरगदूर येथील सरकारी माध्यमिक शाळेतील एसएसएलसीचा विद्यार्थी संकेत (वय १६) विशेष वर्गाला हजेरी लावल्यानंतर शाळेबाहेर काही मुलांमध्ये सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेला असता ही घटना घडली. या वेळी वाद विकोपाला जाऊन त्याच्यावर हल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलिस अधीक्षक निखिल बी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

संकेत ज्या शाळेत शिकत होता, त्याच शाळेतील माजी विद्यार्थ्यांनीच त्याची हत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या सातही अल्पवयीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, अधिक चौकशी सुरू आहे.

क्रिकेट सामन्यातील वादातून हत्येची ठिणगी

दोन दिवसांपूर्वी झालेल्या क्रिकेट सामन्यातील किरकोळ वादातून ही हत्या घडल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणाच्या सखोल तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. आरोपींची गांजा चाचणी करण्यात येणार असून, परिसरातील अमली पदार्थांच्या हालचालींचाही तपास केला जाणार आहे. ऊरगदूर भागात उपपोलीस ठाणे सुरू करण्याबाबतही पावले उचलली जातील, असे एसपी निखिल बी यांनी स्पष्ट केले.

कडक पोलीस बंदोबस्त

हत्येनंतर शिमोगा शहरासह ऊरगदूर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेमागे गांजाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच, परिसरात कायमस्वरूपी पोलीस ठाणे सुरू करण्याची मागणीही करण्यात येत आहे.

कुटुंबाला १५ लाखांची मदत

मृत संकेतच्या कुटुंबीयांना राज्य सरकारतर्फे एकूण १५ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १० लाख रुपये आणि शिक्षण विभागाकडून ५ लाख रुपयांचा समावेश आहे. ही घोषणा जिल्हाधिकारी प्रभुलिंग कवलिकट्टी यांनी केली.

या प्रकरणात अ‍ॅट्रॉसिटी कायद्यान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी झालेल्या गिरीश यालाही मदत देण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यात अमली पदार्थांविरोधात जनजागृती मोहीम राबवली जात असून, संबंधित भागात अधिक पोलीस संरक्षण दिले जाईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिमोगा येथील भाजप आमदार एस. एन. चन्नबसप्पा यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

About Belgaum Varta

Check Also

जमखंडी तालुक्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटून चार जणांचा मृत्यू

Spread the love  जमखंडी : ऊसाने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली उलटून दोन वर्षाच्या मुलासह चार जणांचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *