Tuesday , March 17 2026
Breaking News

विधानसभेत मंत्र्यांकडून उत्तर न मिळाल्याने सभाध्यक्ष खादर नाराज

Spread the love

 

सभागृह स्थगित करून पडले बाहेर, तीन अधिकारी निलंबित

बंगळूर : राज्याच्या विधानसभेत सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याबद्दल सभाध्यक्ष यू. टी. खादर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभागृह स्थगित करून पिठावरून बाहेर पडण्याची दुर्मीळ घटना सोमवारी घडली.

दरम्यान, संतप्त झालेल्या विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांच्या नाराजीमुळे अखेर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

प्रश्नोत्तराच्या तासात सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना मंत्र्यांकडून उत्तर दिले जात नसल्याबद्दल सभापती खादर यांनी संताप व्यक्त केला. “मी सरकारला अनेक वेळा सूचना दिल्या, तरी मंत्र्यांनी त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. अशा परिस्थितीत सभागृह कसे चालवायचे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर का दिले जात नाही, याचे स्पष्टीकरण मंत्र्यांनी देईपर्यंत सभागृह चालवणार नाही, असे सांगत त्यांनी सभागृह स्थगित केले आणि पिठावरून बाहेर पडले.

सभापतींच्या या अचानक निर्णयामुळे सभागृहातील सदस्यांमध्ये आश्चर्य आणि धक्का बसल्याचे वातावरण निर्माण झाले. सदस्यांना परिस्थिती समजून घेण्याआधीच सभापती सभागृह सोडून गेले होते.

विधानसभेत सरकारच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत सभापतींनी सभागृह स्थगित करण्याची घटना अलीकडच्या काळात क्वचितच घडली आहे. यापूर्वी माजी सभापती रमेश कुमार यांच्या कार्यकाळात अशा प्रकारची घटना घडल्याचे सांगितले जाते. यू. टी. खादर सभापती झाल्यानंतर मंत्र्यांनी प्रश्नांना उत्तर न दिल्यामुळे त्यांनी प्रथमच सभागृह स्थगित केले.

प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर लेखी उत्तर देण्याच्या प्रश्नांचा उल्लेख करताना गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी सांगितले की, आज लेखी उत्तर द्यायच्या २८३ प्रश्नांपैकी ८४ प्रश्नांना उत्तर देण्यात आले आहे.

यावेळी विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी सरकारवर टीका करत, “दररोज अशीच परिस्थिती असते. आमच्या प्रश्नांना उत्तरे मिळत नाहीत. आपण आधीच चार वेळा सूचना दिल्या आहेत. सरकारने उत्तर द्यायला हवे,” असे म्हणत सरकारवर हल्लाबोल केला.

त्यावर सभापती खादर यांनी सरकारला फटकारत सांगितले की, “विधानसभा मंत्र्यांसाठी नाही, तर आमदारांसाठी आहे. आमदार आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्यासाठी सभागृहात येतात. सर्व प्रश्नांना सभागृहात उत्तर देणे शक्य नसले तरी उर्वरित प्रश्नांना सरकारने लेखी उत्तर देणे आवश्यक आहे. उत्तरच मिळाले नाही तर आमदार सभागृहात का येतील?”

“या अधिवेशनाच्या सुरुवातीपासून मी मंत्र्यांना चार वेळा सूचना दिल्या आहेत. आज पाचव्यांदा सांगत आहे. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देणे आवश्यक आहे. मात्र आमच्या सूचनांकडे गांभीर्याने पाहिले जात नाही,” अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

यानंतर सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर का दिले जात नाही याचे स्पष्टीकरण मंत्र्यांनी द्यावे, तोपर्यंत सभागृह चालवणार नाही, असे सांगत त्यांनी सभागृह स्थगित केले.

… अन् सभाध्यक्षांची मनधरणी

दरम्यान, नंतर सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी सभापतींची समजूत काढल्यानंतर यू.टी. खादर यांनी दुपारी १.३० वाजता पुन्हा सभागृहाची बैठक बोलावली. “सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर मिळावे यासाठीच मी सभागृह स्थगित केले होते. मुख्यमंत्री, मंत्री आणि अधिकाऱ्यांनी सर्व प्रश्नांना उत्तर देण्याचे आश्वासन दिले आहे,” असे सांगत त्यांनी सभागृह भोजनावकाशासाठी स्थगित केले.

तीन अधिकारी निलंबित

विधानसभेत आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी मंत्री आणि संबंधित अधिकारी अनुपस्थित असल्याने संतप्त झालेल्या विधानसभा अध्यक्ष यू. टी. खादर यांच्या नाराजीमुळे अखेर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी अध्यक्ष खादर यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. तसेच सभागृहात सर्वाधिक उत्तरे प्रलंबित ठेवणाऱ्या विभागांतील अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे कठोर निर्देश त्यांनी दिले. त्यानुसार तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्रीराम सेना हिंदुस्थानच्या वतीने उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

Spread the love  बेळगाव : बेळगाव परिसरात अल्पवयीन मुलींवर सातत्याने होत असलेल्या अन्यायाविरोधात आणि तिला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *