
संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी अडचणीत
बंगळूर : ग्रामीण विकास व पंचायत राज मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी अखेर मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. ते उद्या (ता. 15) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा सुपूर्द करतील. बेळगावचे कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येस कारणीभुत असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. त्यामुळे काँग्रेस पक्षाने त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन हाती घेतले होते.
राज्यातील भाजप सरकारची ही दुसरी विकेट आहे. रासलीला सीडी प्रकरणी रमेश जारकीहोळी यांनी यापूर्वीच मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.
शिमोगा येथे तातडीच्या पत्रकार परिषदेत बोलताना ईश्वरप्पा म्हणाले की, मी संतोष आत्महत्या प्रकरणात कोणतीही चूक केलेली नाही. तपासात सर्व तथ्य समोर येईल. मी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि भाजपच्या मान्यवरांशी आधीच चर्चा केली आहे. चौकशीतून माझी निर्दोष मुक्तता होईल. मला मदत करणार्या प्रत्येकाचा मी आभारी आहे. मी उद्या संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राजीनामा देणार आहे.
उद्या (शुक्रवारी) मी मुख्यमंत्र्यांना राजीनामा सुपूर्द करणार आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली आहे. मी मुख्यमंत्री आणि सर्व मित्रांचे आभार व्यक्त करतो. मी सर्व गोष्टींना तोंड देत मुक्तपणे बाहेर पडत आहे. पक्ष नाराज होऊ नये म्हणून मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. 3-4 दिवसांपूर्वीच राजीनामा देण्याचा आपण निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्री ईश्वरप्पा यांनी काल (बुधवारी) राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले होते. परंतु आज सकाळपासून ईश्वरप्पा यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तीन दिवसांपासून ते माध्यमांशी बोलले नव्हते. ईश्वरप्पा यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषद घेऊन मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले.
संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी संतोष पाटील यांचा भाऊ प्रशांत याने बुधवारी फिर्याद दिली. के. एस. ईश्वरप्पा हे पहिले आरोपी आहेत. ईश्वरप्पा यांच्या निकटवर्तीयांच्या नावाचाही तक्रारीत समावेश आहे. मंत्री ईश्वरप्पा यांच्यावर आयपीसी कलम 306 अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे.
बेळगाव जिल्ह्यातील हिंडलगा येथील संतोष पाटील या ठेकेदाराने आत्महत्या केली. संतोष पाटील काही महिन्यांपूर्वी चर्चेत आले होते, जेव्हा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहून ईश्वरप्पा यांच्यावर 40 टक्के कमिशन मागितल्याचा आरोप केला होता. आरोप फेटाळून ईश्वरप्पा यांनी संतोष पाटील यांच्यावर मानहानीचा दावा दाखल केला होता. चौकशी सुरू असतानाच, संतोष पाटीलने 12 एप्रिल रोजी उडुपी येथील केएसआरटीसी बस स्टँडजवळील शांभवी लॉजमध्ये आत्महत्या केली.
आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्या मृत्यूला मंत्री ईश्वरप्पा जबाबदार असल्याचा संदेश व्हॉट्सअॅपने सर्व माध्यम प्रतिनिधींना पाठवला होता. मंत्री ईश्वरप्पा यांनी राजीनामा द्यावा आणि त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करावा, अशी मागणी काँग्रेसने केली. काल दुपारी झालेल्या घटनेनंतर संतोषच्या आत्महत्येप्रकरणी उडुपी शहर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta