लवकरच दोषमुक्त होण्याचा विश्वास, चाहत्यांच्या समर्थनार्थ घोषणा
बंगळूर : ग्रामीण विकास व पंचायत राज खात्याचे मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी गुरूवारी घोषणा केल्याप्रमाणे आज (ता. १५) सायंकाळी सुमारे सव्वाआठ वाजता मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा सादर केला. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मंजूर केला आहे. ईश्वरप्पा यांच्यावर कंत्राटदार संतोष पाटील यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होता. त्यामुळे कॉंग्रेसने त्यांच्याराजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू केले होते.
ईश्वरप्पा यांनी आज आपल्या शिमोगा मतदारसंघात कार्यकर्ते व समर्थकांची भेट घेऊन आपण निर्दोष असल्याचे स्पष्ट केले. चौकशीत आपण निर्दोष असल्याचे सिध्द होईल, असा विश्वास व्यक्त करून पुन्हा मंत्रिपदी आरुढ होण्याचा विश्वास व्यक्त केला.
त्यानंतर ते बंगळूरला रेसकोर्स येथील मुख्यमंत्र्यांच्या अधिकृत निवासस्थानी जाऊन एक ओळीचे राजीनामा पत्र त्यांना सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर त्यांचे समर्थक व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. ईश्वरप्पा यांचे आगमन होताच त्यांनी ईश्वरप्पा यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्या निषेधाच्याही घोषणा दिल्या.
मुख्यमंत्र्याना राजीनामा पत्र सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी, आपण स्वच्छेने राजीनामा देत असल्याचे सांगून राष्ट्रीय नेत्यांनी आपणास राजीनामा देण्यास सांगितले नसल्याचे ते म्हणाले. चौकशीत आपण निर्दोष असल्याचे सिध्द होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या आधी शिमोगा शहर मतदारसंघ सोडण्यापूर्वी, भाजपचे ज्येष्ठ नेते के. एस. ईश्वरप्पा यांनी आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि समर्थकांना संबोधीत केले. आपण भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या चौकशीतून निर्दोष मुक्त होऊन पुन्हा मंत्री होईन, असा त्यांनी विश्वस व्यक्त केला. कर्नाटक विधानसभेत ते शिमोगा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात शिमोगा येथील सभेत पक्ष कार्यकर्त्यांसमोर बोलताना ते म्हणाले, कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्येप्रकरणी माझ्यावर आरोप आहे. त्यामुळे मी मंत्रीपदी राहिल्यास तपासावर प्रभाव पडू शकतो, असा आभास होतो. त्यामुळे मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पद सोडण्याच्या निर्णयाचा बचाव करताना ते म्हणाले, भाजपच्या केंद्रीय नेत्यांना असे वाटले पाहिजे की, कलंकित व्यक्ती सत्तेत राहू नयेत यासाठी मी पक्षात नवा निकष लावला आहे. ज्यांनी माझ्याविरुद्ध कट रचला ते आता आनंदी असतील. पण माझे नाव साफ केले जाईल.
ते म्हणाले, माझे इतके अनुयायी आहेत, याचे मला खरोखरच आश्चर्य वाटत आहे. पक्षाचे कार्यकर्ते, आमदार आणि राज्यातील मंत्री कठीण काळात माझ्यासोबत आहेत. या प्रकारच्या पाठिंब्याने माझ्यामध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण झाला, असे ते म्हणाले.
येडियुरप्पा यांचा विश्वास
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे भाजप नेते के. एस. ईश्वरप्पा लवकरच पुन्हा मंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला.
मला विश्वास आहे की, ईश्वरप्पा भ्रष्टाचाराच्या आरोपातून स्वच्छ बाहेर येतील आणि ते पुन्हा मंत्रिमंडळाचा भाग होतील. शिमोगा येथे माध्यमांना संबोधित करताना ते म्हणाले, कंत्राटदार संतोषच्या आत्महत्येची चौकशी तीन महिन्यांत पूर्ण झाल्यास, हे स्पष्ट होईल की ईश्वरप्पा निर्दोष आहेत आणि ते पुन्हा मंत्री होऊ शकतात.
बसवराज बोम्मई यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी सर्वोच्च पदावरून पायउतार झालेले येडियुरप्पा म्हणाले की, ईश्वरप्पा यांनी कोणतीही चूक केली नसतानाही त्यांना पायउतार व्हावे लागले. देव त्याचे भले करेल. चौकशीअंती या प्रकरणात ईश्वरप्पा निर्दोष असल्याचे स्पष्ट होईल, असे ते म्हणाले.