बेंगळुर : कंत्राटदार संतोष पाटील यांच्या आत्महत्या प्रकरण मागे काँग्रेसचा हात असून त्यांच्या हावभावावरून हि बाब निदर्शनास येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा, मंत्री ईश्वरप्पा यांचा राजीनामा पक्षाने जड अंतःकरणाने स्वीकारला असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे.
विजापूर जिल्ह्यातील तोरवी येथे लक्ष्मी नरसिंह देवस्थानात दर्शनासाठी आलेल्या प्रल्हाद जोशींनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ईश्वरप्पांनी आपल्यावर झालेल्या आरोपातून निर्दोष मुक्त होण्याच्या विश्वासाने राजीनामा दिला असून यामागे काँग्रेसचा हात असल्याचा आरोप प्रल्हाद जोशींनी केला. सीडी प्रकरणाच्या मागे कार्यरत असणार्या टोळीचाही पर्दाफाश व्हावा, याचा तपास व्हावा, तपासाअंती सत्य उजेडात येईल, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार असून रिक्त मंत्रीपदे मुख्यमंत्री भरणार असल्याचे त्यांनी सांगितले. ईश्वरप्पांनी राजीनामा दिल्यानंतर एकूण पाच मंत्रीपदे रिक्त असून या पदावर लवकरच नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती जोशींनी दिली.
