बेळगाव, चिक्कोडी जिल्हा ’अ’ श्रेणीत, उत्तीर्णतेत मुलींचे प्रमाण अधिक
बंगळूर : कर्नाटक माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाने आज दहावी (एसएसएलसी) बोर्डाचा निकाल जाहीर केला. यावर्षी एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी 85.63 टक्के आहे. मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण यावर्षीही मुलांपेक्षा अधिक (90.29 टक्के) आहे, तर मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी 81.30 टक्के आहे. यावेळी निकालाच्या टक्केवारीनुसार जिल्ह्यांची गुणवत्ता यादी बनविण्यात आली नसून त्यांना श्रेणी देण्यात आली आहे. बेळगाव व चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्याना ’अ’ श्रेणी प्राप्त झाली आहे.
निकाल विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर देखील पाठविला जाईल, तर दहावीचे विद्यार्थी 19 मे रोजी दुपारी एकनंतर निकाल पाहण्यासाठी अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात. त्याना sslc.karnataka.gov.in वर निकाल पहाता येईल.
यावर्षी, दहावीच्या परीक्षेसाठी एकूण 8 लाख 73 हजार 859 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, परंतु केवळ 8 लाख 53 हजार 436 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. 20 हजार 423 विद्यार्थी गैरहजर म्हणून चिन्हांकित झाले होते.
परीक्षेला बसलेल्या 8 लाख 53 हजार 436 विद्यार्थ्यांपैकी 7 लाख 30 हजार 881 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. एकूण तीन लाख 52 हजार 752 मुले आणि तीन लाख 68 हजार 579 मुली दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांच्या म्हणाले, कर्नाटकातील 32 जिल्ह्यांनी ’अ’ श्रेणी मिळवली आहे तर बंगळूर दक्षिण आणि यादगीर या दोनच जिल्ह्यानी ’ब’ श्रेणी मिळवली आहे. याव्यतिरिक्त, 145 विद्यार्थ्यांनी 625/625 पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत. राज्याच्या ग्रामीण भागाने शहरी भागातील विद्यार्थ्यांची कामगिरी मागे टाकली आहे, कारण शहरी भागातील एकूण दोन लाख 92 हजार 946 विद्यार्थी (86.64 टक्के) उत्तीर्ण झाले आहेत, तर ग्रामीण भागातील चार लाख 28 हजार 385 विद्यार्थी (91.32 टक्के) उत्तीर्ण झाले आहेत.
समाजशास्त्र विषयात सर्वाधिक 50 हजार 782 विद्यार्थ्यांनी पूर्ण गुण मिळवले, त्यानंतर तिसर्या भाषेत 43 हजार 126 विद्यार्थ्यांनी परिपूर्ण गुण मिळवले.
40 हजार विद्यार्थ्याना ग्रेसमार्क्सचा लाभ
दहावीच्या परीक्षेत थोडक्यात अनुत्तिर्ण होणार्या विद्यार्थ्यांना कृपांक (ग्रेस मार्क्स) देऊन उत्तीर्ण करण्यात आले. याचा 40 हजार 61 विद्यार्थ्याना लाभ झाला. सरकारी शाळांचा निकाल 88 टक्के लागला असून अनुदानित शाळांचा निकाल 87.84 टक्के आहे. विनाअनुदानित शाळांचा निकाल सर्वाधीक 92 टक्के लागला आहे.
20 शाळांचा निकाल शुन्य टक्के
विशेष म्हणजे राज्यातील 20 शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे. त्यामध्ये 2 सरकारी शाळा, 3 अनुदानित व 15 विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे.
32 जिल्ह्याना ’अ’ श्रेणी
यावेळी निकालाच्या टक्केवारीनुसार जिल्ह्याची राज्यातील गुणवत्ता यादी न करता श्रेणी देण्यात आली आहे. 75-100 टक्के निकालाच्या जिल्ह्याना ’अ’ श्रेणी, 60-75 टक्के निकालाच्या जिल्ह्याना ’ब’ श्रेणी व 60 टक्यापेक्षा कमी टक्के निकाल असलेल्या जिल्ह्याना ’क’ श्रेणी देण्यात आली आहे. बेळगाव, चिक्कोडीसह 32 जिल्हे ’अ’ श्रेणीत असून बंगळूर दक्षिण व यादगिरी हे दोनच जिल्हे ’ब’ श्रेणीत आले आहेत. ’क’ श्रेणीत एकाही जिल्ह्याचा समावेश नाही.
चांगले गुण मिळवू न शकलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी, कर्नाटकने विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य टेलि-हेल्पलाईन उघडली आहे. ज्या विद्यार्थ्यांना कमी, अस्वस्थ, चिंताग्रस्त, नैराश्य किंवा भीती वाटत आहे त्यांना मानसिक आरोग्य हेल्पलाईन 080-46110007 वर कॉल करण्यास प्रोत्साहित केले जाते. यश आणि अपयश हे जीवनाचा भाग आहेत आणि ते एकाच नाण्याच्या दोन बाजूसारखे आहेत. निकालाची अपेक्षा करण्यासाठी एसएसएलसी विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत आशा गमावू नये, असे कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के सुधाकर म्हणाले.
Belgaum Varta Belgaum Varta