Sunday , September 8 2024
Breaking News

हिंदुत्वाच्या नावाने भाजप तरुणांची दिशाभूल करतंय : एच. डी. कुमारस्वामी

Spread the love

बेंगळूर : भाजप हिंदुत्व आणि हिंदु राष्ट्राच्या नावाने तरुणांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जेडीएस नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी केलाय. तसेच भाजपाने तरुणांची दिशाभूल करण्याऐवजी नोकर्‍या निर्माण करण्यावर आणि त्यांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करावं असंही कुमारस्वामींनी म्हटलंय. जेडीएस कर्नाटकातील 2023 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला सत्तेवर आणण्यासाठी युवाशक्तीचा वापर करण्यावर भर देईल. तसेच राज्यात 123 जागा जिंकण्याचं आपलं लक्ष्य असून महिलांचं संघटन मजबूत करणार असल्याचं एच. डी. कुमारस्वामी म्हणाले.
केंद्रातील भाजप सरकारने सत्तेत येण्याआधी 2 कोटी नोकर्‍या देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु रोजगार देण्याऐवजी त्यांनी बेरोजगारीचे मोठे संकट निर्माण केले आहे. 14 महिन्यांच्या काँग्रेस-जेडीएस आघाडी सरकारने नऊ जिल्ह्यांमध्ये औद्योगिक क्लस्टर्स उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, याकडे भाजपने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे, तसेच करोनामुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या असून सरकारी नोकरभरती देखील बंद असल्याचं ते म्हणाले. भाजप हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्यावर भर देऊन प्रसिद्धी मिळवत आहे. ते हिंदुत्वाच्या नावाने देशातील तरुणांची भावनिकपणे दिशाभूल करत आहेत. आज देश आणि राज्यातील तरुणांना रोजगाराची गरज आहे. जेणेकरून ते त्यांच्या कुटुंबाला आधार देऊ शकतील, असंही त्यांनी म्हटलंय.
यावेळी कुमारस्वामी यांनी कार्यकर्त्यांना चला बेरोजगारी मिटवण्यावर आणि आपल्या युवकांना रोजगार देण्यावर लक्ष केंद्रित करूया. आधी आपले आणि आपल्यावर अवलंबून असणार्‍या लोकांचे आयुष्य घडवण्याकडे लक्ष द्या आणि नंतर हिंदुत्व किंवा हिंदु राष्ट्राचा विचार करा. हिंदुत्वाच्या नावावरून तरुणांची दिशाभूल करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांवर मात करण्यासाठी काम करा. राज्यातील लोकांसाठी चांगलं सरकार आणण्यासाठी तरुण आणि महिला शक्ती एकत्र करण्यावर भर देऊया, असं कुमारस्वामी जेडीएसच्या कार्यकर्त्यांना म्हणाले.
30-35 महिलांना देणार उमेदवारी
दरम्यान, जेडी (एस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी बुधवारी सांगितले की, कर्नाटकातील 2023 च्या विधानसभा निवडणुकीसाठी किमान 30-35 मतदारसंघात महिला उमेदवार उभे करण्याची पक्षाची योजना आहे. ते म्हणाले की पक्षाला संघटनेच्या कामात मदत करण्यासाठी महिला उमेदवारांना प्राधान्य द्यायचे आहे आणि त्यांची महिला शाखा मजबूत करायची आहे.
आम्हाला यावेळी 2023 च्या विधानसभा निवडणुकीत अधिक महिला उमेदवार उभे करायचे आहेत, किमान 30-35 जागांवर (एकूण 224 पैकी) आम्हाला महिलांना उमेदवारी देत मैदानात उतरवायचे आहे, आम्ही मतदारसंघ निश्चित करत आहोत. पहिल्या टप्प्यात आम्ही सहा ते सात महिलांना उमेदवारी देण्याचे ठरविले आहे, असे कुमारस्वामी म्हणाले.
दरम्यान, कर्नाटकात 2023 रोजी विधानसभेची निवडणूक होणार आहे. भाजप आपली सत्ता कायम राखण्यासाठी आतापासूनच कामाला लागली आहे. काँग्रेस प्रत्येक जिल्ह्यात जाऊन पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे. तर जेडीएस 2023 च्या निवडणुकीत जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याच्या तयारीला लागला आहे.

About Belgaum Varta

Check Also

रोझरी महाविद्यालय नावेही मडगावात हिंदी कवितांचा पाऊस

Spread the love  मडगाव : दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी रोझरी महाविद्यालयात हिंदी काव्यस्पर्धा आयोजित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *