बेंगलोर : दक्षिण कन्नडमधील सुळ्य तालुक्यातील बल्लारे येथे मंगळवारी रात्री उशिरा भाजप युवा मोर्चाचे नेते प्रवीण नेट्टारू यांची दुचाकीवरून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी प्राणघातक शस्त्रांनी वार करून हत्या केली.
प्रवीण नेट्टारू हे रात्री दुकान बंद करून घरी जात असताना केरळ राज्यातील नोंदणीकृत दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तलवारीने यांच्यावर हल्ला केला.
हत्येची घटना उघडकीस येताच भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. बल्लारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
सकाळी प्रवीणचे शवविच्छेदन पूर्ण झाले असून लवकरच मृतदेह त्यांच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यांच्या मूळ गावी नेट्टारू येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बल्लारे, सुळ्यसह अनेक ठिकाणी नागरिकांनी हत्येच्या घटनेचा निषेध व्यक्त केला.