बंगळूर : भारतीय जनता पक्ष (भाजप) युवा मोर्चा कार्यकर्ता प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येप्रकरणी कर्नाटक पोलिसांनी गुरुवारी दक्षिण कन्नड जिल्ह्यातून दोघांना अटक केली. सावनूर येथील झाकीर (वय २९) आणि बेल्लोरेचा शफीक (वय २७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती दक्षिण कन्नडचे पोलीस अधीक्षक ऋषिकेश सोनवणे यांनी दिली.
अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आलोक कुमार म्हणाले की, विविध संघटनांशी संबंधित 21 जणांना ताब्यात घेण्यात आले असून या प्रकरणाच्या संदर्भात त्यांची चौकशी केली जात आहे. आम्हाला कोणाच्या विरोधात पुरावे आढळल्यास आम्ही कायदेशीर कारवाई करू. ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये एसडीपीआय आणि पीएफआयच्या सदस्यांचा समावेश आहे. तपास अधिकार्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून आम्ही सर्व संशयित व्यक्तींची कायदेशीररीत्या चौकशी करत आहोत. आम्ही त्यांचे जबाब घेऊन त्यांचा या प्रकरणात सहभाग नसेल तर त्यांना सोडून देऊ. मी वैयक्तिकरित्या तपासावर लक्ष ठेवून आहे. दक्षिण कन्नड एसपी आणि मंगळुरू शहर पोलीस देखील या प्रकरणात काम करत आहेत, असे ते म्हणाले.
मंगळवारी रात्री प्रवीणची त्याच्या मालकीच्या अक्षया फ्रेश चिकन फार्मजवळ तलवारीने वार करून हत्या करण्यात आली होती..
सूत्रांनी सांगितले की, पोलिसांनी प्रवीणच्या दुकानाजवळील सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून त्यात एक व्यक्ती संशयास्पदरित्या फिरताना दिसत आहे.
फुटेजमध्ये संशयित सुमारे ३० मिनिटे दुचाकीवर रस्त्याच्या कडेला थांबलेला आणि खून होण्यापूर्वी चिकन शॉपच्या दिशेने जाताना दिसत आहे. दरम्यान, संबंधित घटनाक्रमात, गुरुवारी प्रवीणच्या घरी भेट देणारे पुत्तूरचे आमदार संजीव मातंडूर यांना कुटुंबीयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. प्रवीणची पत्नी नुथना हिने विचारले, की तुम्ही दोन दिवस कुठे होता? माझे पती २४ तास पार्टीसाठी काम करत होते. ते सतत अंगारण्णा (मंत्री एस अंगार) आणि भाजप प्रदेशाध्यक्ष नलीनआण्णा या नेत्यांच्या मागे धावत होते, असे त्या आरोपींच्या अटकेची मागणी करत म्हणाल्या.