येडियुराप्पांच्या स्वीय सहाय्यकांवरही कारवाई, 50 ठिकाणी छापे
बंगळूरू : कर्नाटक व गोवा शाखेच्या आयकर विभागाच्या अधिकार्यांनी गुरुवारी पहाटे बंगळूरसह 50 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून शोध कार्य हाती घेतले. प्राप्तिकर अधिकार्यांनी शहरातील आघाडीचे व्यापारी, व्यावसायिक कंपन्या आणि चार्टर्ड अकाउंटंट यांच्या घरावरही छापे टाकले आहेत. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पांचे स्वीय सहाय्यक उमेश यांचे घर व कार्यालयावर छापा घालून मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत.
बेंगळुर आणि गोवा झोनच्या 300 हून अधिक आयटी अधिकार्यांनी या कारवाईत भाग घेऊन तपासकार्य हाती घेतले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक पाटबंधारे विभागाच्या कंत्राटदारांच्या घरांवरही छापे घलण्यात आले. पहाटे पाचच्या सुमारास ही कारवाई सुरू झाली. अधिकार्यांच्या प्रत्येक तुकडीत सुमारे 10 अधिकार्यांचा समावेश होता. आयटी अधिकार्यांनी 120 इनोव्हा कार पूर्वनिर्धारित केल्या होत्या.
कोडीगेहळ्ळी सहकार नगरातील राहुल एंटरप्रायझेसवर आयटी छापा टाकण्यात आला. राहुल एंटरप्राइज सिमेंट आणि स्टील डीलरच्या कार्यालयात आयटी अधिकार्यांनी तपासणी केली. तीन इनोव्हा क्रिस्टा कारमधून आलेल्या अधिकार्यांनी या तपास कार्यात भाग घेतला. त्याचप्रमाणे बंगळुरच्या हेगडे नगरातील एन. आर. रॉयल अपार्टमेंटमधील चार्टर्ड अकाउंटंट अमला यांच्या घरावर आयटीने छापा टाकला.
हेगडे नगरातील एन. आर. रॉयल अपार्टमेंटमधील चार्टर्ड अकाउंटंट अमला तेथे राहत असल्याचे सांगितले जाते. आयटी छाप्याच्या पार्श्वभूमीवर अपार्टमेंटजवळ पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सहकार नगरात राहुल एंटरप्रायझेसचे सिमेंट आणि स्टील डीलरचे कार्यालय आहे. पोलीस बंदोबस्तात तेथे कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
जलसंपदा विभागाच्या मोठ्या सिंचन प्रकल्पांवर काम करणार्या अनेक ठेकेदारांवरही छापे घालण्यात आले. कृष्णा भाग्यजल महामंडळाच्या कामात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
तसेच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे स्वीय सहाय्यक उमेश यांच्या घरावर आज आयकर विभागाच्या अधिकार्यांनी छापा टाकला. बंगळुरूमधील भाष्यम सर्कल येथे असलेले उमेश यांचे घर व कार्यालयासह चार ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. उमेश हे येडियुराप्पा, खासदार राघवेंद्र आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विजयेंद्र यांचे पीए असल्याप्रमाणे काम करीत होते.
कोण आहे उमेश?
शिमोगा जिल्हा आयनूरचा रहिवासी उमेश सुरुवातीला विधानसभा सदस्य अय्यनुर मंजुनाथांचा स्वीय सहाय्यक म्हणून कांही काळ काम करीत होता. 2012 पासून येडियुराप्पांचा स्वीय सहाय्यक म्हणून तो काम करीत होता. विजयेंद्र यांचाही तो निकटवर्तीय झाला. उमेश हे प्रथम बीएमटीसीचे बस कंडक्टर कम चालक होते. येलहंका येथील पुट्टेनहळ्ळी बीएमटीसी डेपोत त्यांनी काम केल्याचे समजते.
उमेशच्या घरातील मोठे दस्तऐवज व कागदपत्रे अधिकार्यांनी जप्त केल्याचे समजते. कंत्राटदारांशी संबंधित मोठ्या प्रमाणात कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली आहेत. 30 पेक्षा अधिक ठिकाणी शोध सुरू आहे. राजाजीनगर राममंदिर परिसरातील उमेशचे घर, नागसंद्रामध्ये उमेश यांच्या मालकीचे असलेले धवळगिरी नावाचे घर, कंत्राटदार डी. वाय. उप्पार, ए. वाय. कट्टीमनी यांच्या ठिकाणीही शोध सुरू आहे. बिदरचे कंत्राटदार सुरेश काणजी आणि बंगळुरूच्या सहकार नगरातील सिमेंट आणि लोह पुरवठादार राहुल एंटरप्रायजेसचाही उशीरापर्यंत तपास करण्यात येत होता.
Check Also
शिक्षण मंत्र्यांनाच येत नाही कन्नड
Spread the loveविद्यार्थ्याच्या शेऱ्यांने मंत्री झाले संतप्त; कारवाईचा दिला आदेश बंगळूर : व्हिडिओ कॉन्फरन्स संभाषणात …