बंगळूर : स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यानंतर भाजप पक्ष आणि सरकारमध्ये काही मोठे बदल होणार असल्याच्या चर्चे दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल रात्री अचानक आरएसएस कार्यालयाला भेट दिली. त्यामुळे राजकीय वर्तुळात औत्सुक्य निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल रात्री त्यांच्या रेसकोर्स रोड येथील निवासस्थानी जनोत्सवासंदर्भात बंगळुर ग्रामीण, कोलार आणि चिक्कबळ्ळापूर जिल्ह्यांतील मंत्री, आमदार आणि नेत्यांची बैठक घेतल्यानंतर चामराजपेठ येथील आरएसएस मुख्यालयाच्या केशवकृपाला भेट दिल्याने विविध अर्थ काढले जात आहेत.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल रात्री ९ ते ११ या वेळेत केशवकृपा येथे संघाच्या नेत्यांशी चालू घडामोडींबाबत चर्चा केल्याचे सांगण्यात येते. मुख्यमंत्र्यांनी केशवकृपामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सी. आर. मुकुंद यांच्याशी स्वतंत्र भेट घेतल्याने आणखी उत्सुकता वाढली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या अचानक भेटीमुळे पक्ष वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे, पक्ष आणि सरकारी पातळीवर काही बदलांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी संघ प्रमुखांशी चर्चा केल्याचे बोलले जात आहे.
संतोष यांची भेट
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी काल सायंकाळी भाजपचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस बी.एल. संतोष यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांच्याशी काही वेळ चर्चा केली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आरएसएस कार्यालयाला भेट दिली. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी मंत्री आर. अशोक यांनीही केशवकृपेला भेट दिली. या सर्व घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात बदल घडणार असल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भेटीबाबत भाजपचा एकही नेता तोंड उघडत नाही. सर्वांनी मौनाला शरणागती पत्करली आहे.
अरुणसिंग शहरात
राज्य भाजपचा नुतन सारथी नेमला जात असल्याच्या चर्चेदरम्यान, प्रदेश भाजपचे प्रभारी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अरुणसिंग हे आज संध्याकाळी दोन दिवसांच्या दौऱ्यावर राज्यात येणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीनकुमार कटील यांचा कार्यकाळ या महिन्याच्या २० तारखेला संपणार असून भाजपला नवीन अध्यक्षाची नियुक्ती करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर अरुण सिंह, राज्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यासह अनेक नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येते.
सायंकाळी पाचच्या सुमारास दिल्लीहून बंगळूरला येणारे अरुणसिंग अनेक नेत्यांशी चर्चा करून कुमारकृपा गेस्ट हाऊसमध्ये रात्र घालवतील. उद्या भाजप कार्यालयात होणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थित राहून ते रात्री दिल्लीला परतणार आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta